गेली बारा वर्षे रखडलेला आणि कोकणची प्रगती थांबवणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी उशिरा का होईना पण या महत्त्वाच्या प्रश्नावर जागे झालेल्या महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींसह नेतेमंडळी एकत्र येत आहेत हे स्वागतार्ह आहे. दीर्घकाळ रखडलेल्या महामार्गसह कोकणच्या विविध प्रश्नांकडे सातत्याने होणाऱया दुर्लक्षाला नेतेमंडळींची उदासीनता कारणीभूत आहे. या आंदोलनातून कोकणच्या प्रगतीच्या महामार्गाला भविष्यात चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच हे आंदोलन काही राजकारण्यांच्या पोट ठेक्यांना चालना देण्यासाठी असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा रायगड जिल्हय़ातील पळस्पे ते सिंधुदूर्गमधील पत्रादेवीपर्यंतचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एकूण 460 कि.मी. लांबीचा आहे. यामध्ये झाराप ते पत्रादेवीपर्यंतचे चौपदरीकरण 2013मध्ये पूर्ण करण्यात आले. आजपर्यंत रायगड जिल्हय़ात 74.46 पैकी 37 कि.मी, रत्नागिरी जिल्हय़ात 198 पैकी 90, तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात 82 कि.मी. पैकी 81 कि.मी. लांबीचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच इंदापूर ते झारापदरम्यान 355 पैकी 209 कि.मी.चे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरीत 146 कि.मी. काम रखडलेले असून डिसेंबर 2022 पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
पाच वर्षांत अवघे 64 टक्केच काम
कामे वेगाने होण्यासाठी इंदापूर ते झाराप दरम्यान जानेवारी 2018 पासून काम सुरू होऊनही आतापर्यंत एकूण 64 टक्केच काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 दरम्यान कोविड महामारीमुळे कामाला बेक लागल्याने रस्ते वाहतूक मंत्रालयाने सदर कंत्राटदार कंपन्यांना 12 ते 15 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
राजकीय ठेकेदारांमुळे तीनतेरा
रत्नागिरी जिल्हय़ात चौपदरीकरण रखडण्यास अनेक कारणे आहेत. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी केलेला विरोध, त्यांच्या मागण्या पुढे करून राजकीय नेतेमंडळींकडून सूचवलेले बदल, काहीजण न्यायालयात गेल्याने भूसंपादन, मोबदला वाटपात झालेला विलंब आदी कारणांसह महत्वाचे म्हणजे पोटठेकेदार नेमण्यासाठी राजकीय नेत्यांचा मोठा हस्तक्षेप हे प्रमुख कारण असल्याचे जगजाहीर आहे. डोंगर, माती खोदाई, पाणी योजना, वीजवाहिन्यांचे स्थलांतर, पाणीपुरवठा टँकर, वृक्षतोड, जेसीबीसह यंत्रसामुग्री पुरवणे आदी विविध कामांत राजकीय ठेकेदारांचा शिरकांव झाल्याने चौपदरीकरणाचे तीनतेरा वाजल्याचा आरोप होत आहे.
कामे रखडली, कंत्राटदार बदलत गेले
चौपदरीकरणाच्या कामांना गती मिळण्यापेक्षा मुळ कंत्राटदार कंपनी आणि पोटठेकेदार यांच्यातील वादातून कंत्राटदारच बदलत गेले. पुलांची कामेही त्यातूनच रखडल्याने शेवटी कंपनी बदलून पुलांची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी त्या-त्या टप्प्यातील चौपदरीकरण कंत्राटदार कंपनीकडे सोपवण्यात आली. संगमेश्वर, रत्नागिरी टप्प्यात काम करणाऱया एम.ई.पी. कंपनीने गाशा गुंडाळल्यानंतर पुणे येथील रोडवेज सोल्यूशन इन्फ्रा या कंपनीबरोबर करार अंतिम टप्प्यात आहे. चिपळूण टप्प्यातही मूळ चेतक कंपनीने काम सोडल्यानंतर त्यांची सहयोगी ईगल इन्फ्रा कंपनीने काम हाती घेतले आहे. मात्र इतर ठिकाणांपेक्षा रत्नागिरी जिल्हय़ातीलच कंपन्या काम सोडून का गेल्या याचे कारण गुलदस्त्यातच आहे.
उच्च न्यायालयानेही घेतली दखल
खड्डेमय महामार्ग आणि त्यानंतर रखडलेले चौपदरीकरण याबाबत चिपळूणचे सुपूत्र ऍड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर सुरू असलेल्या प्रत्येक सुनावणीत न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला फटकारले. एवढेच नव्हे तर महामार्ग पूर्ण होईपर्यंत दुसरा कुठलाही प्रकल्प हाती घेऊ नये असेही ठणकावले आहे. राज्य अथवा केंद्र सरकारकडून अजूनही त्यावर समाधानकारक उत्तर नाही. प्रत्येकवेळी काम पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाते मात्र त्यानुसार पूर्तता होत नसल्याने आता ऍड. पेचकर यांनी न्यायालयाचा अवमान म्हणून अधिकाऱयांविरोधात याचिका दाखल केली आहे.
‘समृध्दी’ पूर्णत्वाकडे, ‘मुंबई-गोवा’ खड्डय़ातच
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मागावून सुरूवात झालेला मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग पूर्णत्वाकडे चालला असतानाच कोकणातील महामार्ग अजूनही खड्डय़ातून वर येताना दिसत नाही. रखडलेल्या महामार्गावरून प्रवास करताना जनतेत प्रचंड असंतोष आणि कोकणी नेतृत्वाबद्दलची चीड आहे.
सिंधुदूर्ग एक पाऊल पुढे
कुणी काहीही म्हणो पण विकासाच्या बाबतील सिंधुदूर्ग एक पाऊल पुढेच आहे. त्या पाठोपाठ रायगड आहे. मात्र रत्नागिरी जिल्हा खूपच पिछाडीवर आहे. सिंधुदूर्गमध्ये विमानतळ झाले, वैभववाडी-कोल्हापूर नव्या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागला. चौपदरीकरणही पूर्णत्वास गेले. तर रत्नागिरी जिल्हय़ात विकासाची गाडी हेलकावे खात आहे.
गडकरींच्या नावावर याही विक्रमांची नोंद
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याच प्रयत्नातून खऱयाअर्थाने चालना मिळाली. एकीकडे गडकरी रस्ते बांधणीचे देशात विक्रमावर विक्रम रचत असताना बारा वर्षांपासून कोकणातील महामार्ग रखडला हाही नवा विक्रमच म्हणायला हवा. रखडलेल्या या महामार्गांचीही विक्रमांत कुठेतरी नोंद व्हायला हवी, असा आग्रह कोकणी जनतेने धरला तर ते चुकीचे ठरू नये.
यापूर्वीच ठणकावले असते तर ही वेळ आली नसती
रत्नागिरी जिल्हय़ातील काम रखडले आणि सहनशीलता संपली म्हणून राष्ट्रवादी, शिवसेनेसह काँग्रेस पक्षाकडून गुरूवारी महामार्गावर आंदोलन केले जाणार आहे. मात्र ठेकेदार कंपन्यांना यापूर्वीच असे ठणकावले असते तर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती.
राजेंद्र शिंदे








