वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पोर्तुगालमधील लिस्बन येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा भारताचा भालाफेक ऍथलिट नीरज चोप्राने सर्वोत्तम कामगिरी करत प्रथम स्थान मिळविले. या स्पर्धेत नीरज चोप्राने 83.18 मीटर भालाफेक केली.
जवळपास एक वर्षानंतर नीरज चोप्रा पहिल्याच आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झाला होता. पुरुषांच्या भालाफेकमध्ये शेवटच्या आणि सहाव्या प्रयत्नात नीरजने 83.18 मीटरची नोंद केली. पहिल्या प्रयत्नात त्याने 80.71 मीटरची नोंद केली होती. गेल्यावर्षीच्या जानेवारीमध्ये दक्षिण आप्रेकेत झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत 23 वर्षीय नीरज चोप्राने टोकिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. नीरज चोप्राने या क्रीडा प्रकारात यापूर्वी 88.07 ही सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले होते.









