अफ्रोज अहमद यांची हरकुळ खुर्द तलाव परिसराला भेट
कणकवली:
सहय़ाद्रीचा परिसर जैवविविधतेने संपन्न आहे. तर हरकुळ खुर्द तलाव परिसर पाहिल्यानंतरही मन हरखून जाते. हा निसर्गसंपन्नतेचा ठेवा जपायला हवा. यासाठी ग्रामस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे आवाहन नवी दिल्ली येथील भारत सरकारचे वेटलँड समिती सदस्य तथा महाराष्ट्र सरकारच्या महसूल व वन मंत्रालयाचे पर्यावरण सल्लागार डॉ. अफ्रोज अहमद यांनी काढले.
डॉ. अहमद यांच्या नेतृत्वाखाली पाणथळ समिती, पर्यावरण तज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ व जैवविविधता मंडळ, सल्लागार सदस्य जिल्हा दौऱयावर आले आहेत. समितीने नुकतीच हरकुळ खुर्द येथील तलाव परिसराला भेट देत पाहणी केली. यावेळी औषधी वारसा जपणाऱया वृक्षांचे रोपण डॉ. अहमद व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते तेथे करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी येथील दुर्मिळ वनस्पती देवराई, औषधी वनस्पती या ठेव्याकडे डॉ. अहमद यांचे लक्ष वेधले.
या प्रसंगी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ रासम, सहसचिव सुरेश रासम, राजेंद्र डिचवलकर, अविनाश रासम, किशोर राणे, विजय रासम, वेटलँड समितीचे सदस्य तथा वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे, संदीप राणे, युरेका सायन्स क्लबच्या सौ. सुषमा केणी, सचिन देसाई, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, वनतज्ञ आदी उपस्थित होते.









