पालेभाज्यांचे दर स्थिर
प्रतिनिधी/ बेळगाव
दर शनिवारी भाजी मार्केटमध्ये असणारी वर्दळ शनिवारी लोकसभा पोटनिवडणुकीमुळे थंडावलेली पाहायला मिळाली. सकाळपासून भाजी विक्री करणारे विपेते भाजी घेऊन बसले असले तरी ग्राहकांची संख्या कमी होती. शिवाय बाजारातील काही दुकाने निवडणुकीमुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे खडेबाजार, गणपत गल्ली आदी भागात नागरिकांची वर्दळ कमी पाहायला मिळाली. शनिवारच्या किरकोळ आठवडी बाजारात भाजीपाल्यांची आवक होती. त्यामुळे दरही मागील आठवडय़ाच्या तुलनेत स्थिर होते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथीचे दर वाढले आहेत. वाढत्या तापमानामुळे ग्राहकांकडून हिरव्या भाजीपाल्याला पसंती दिली जात आहे. त्यामुळे गाजर, बिट, काकडी, मुळा यासह हिरव्या भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात मेथी 15 रु. एक पेंढी, कांदापात 20 रु. तीन पेंढय़ा, पालक 10 रु. दोन पेंढय़ा, शेपू 20 रु. तीन पेंढय़ा, लाल भाजी 10 रु. दोन पेंढय़ा, पुदिना 10 रु. दोन पेंढय़ा, फ्लॉवर 20 रु. एक, ढबू मिरची 30 रु. किलो, काकडी 40 रु. किलो, कोबी 5 रु. एक, बटाटा 20 रु. किलो, टोमॅटो 20 रु. किलो, कांदा 20 रु. किलो, गाजर 20 रु. किलो, गवार 60 रु. किलो, शेवग्याचा शेंगा 10 रु. दोन पेंढय़ा, लिंबू 10 रुपयांना दोन अशा पद्धतीने विविध भाज्यांची विक्री सुरू होती. एरव्ही एक-दोन रुपयांना विक्री होणाऱया लिंबूंची किंमत वाढत्या उष्णतेमुळे वाढलेली पाहायला मिळत आहे.
दिवसेंदिवस खाद्यतेलाच्या मागणीत वाढ होत असून मागील आठवडय़ाच्या तुलनेत पुन्हा खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे वाढत्या खाद्यतेलाचा चटका सर्वसामान्यांना बसत आहे. फॉर्च्युन तेलाचा डबा 2750 रुपये, जेमिनी 2750 रु., हेल्थफीट 2750 रु., शेंगातेल 2600 रुपये, सोयाबिन 2300 रुपये, पामतेल 2200 रुपये असा प्रति तेलडब्याचा दर आहे. मागील आठवडय़ाच्या तुलनेत सोयाबिन आणि पामतेलाच्या डब्यामागे 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींबरोबर हॉटेल चालकांनाही याचा फटका बसणार आहे.









