इंग्लंडविरुद्ध मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने विराटसेना मैदानात उतरणार, उभय संघातील तिसरी कसोटी आजपासून
लीड्स / वृत्तसंस्था
घरच्या मैदानावर खेळत असतानाही झगडत असलेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसऱया सामन्यात मैदानात उतरताना विराटसेनेचे मालिकेत आघाडी वाढवण्याचे लक्ष्य असेल. 5 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 2 सामन्यानंतर भारताने 1-0 अशी उत्तम आघाडी घेतली आहे. आज पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल.
कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म ही भारतासाठी एकमेव चिंतेची बाब आहे. पहिल्या दोन कसोटीत ऑफ स्टम्पच्या आसपासचे चेंडू खेळताना त्याने आपली विकेट गमावली असून हेडिंग्लेमध्येही चौथ्या स्टम्पच्या रोखाने येणारे चेंडू खेळताना त्याची अधिक पारख होऊ शकते.
चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांचा फॉर्म लॉर्ड्स कसोटीपर्यंत चिंतेचा होता. मात्र, लॉर्ड्स कसोटीत याच दोघांनी चौथ्या दिवशी जवळपास 50 षटके किल्ला लढवत विजय खेचून आणण्यातही मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर पाचव्या दिवशी गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडत रोमहर्षक विजय संपादन करुन दिला.
रोहित-राहुलमुळे फलंदाजी मजबूत
फलंदाजीत रोहित शर्मा व केएल राहुल यांची दमदार कामगिरी भारतासाठी बलस्थान ठरत आली आहे. या उभयतांचे टेम्परामेंट व टेक्निक अतिशय उत्तम राहिले असून सॉलिड स्टार्ट मिळवून देण्यात ही जोडी यशस्वी ठरत आली आहे. दुखापतग्रस्त मयांक अगरवालच्या जागी संधी मिळाल्यानंतर केएल राहुलची फलंदाजी प्रत्येक डावागणिक बहरत आली आहे. कोणता चेंडू खेळावा व कोणता सोडून द्यावा, याबद्दल देखील केएल राहुल निश्ंिचत असतो, हे दिसून येत राहिले आहे आणि इंग्लिश कंडिशन्समध्ये हीच बाब सर्वाधिक महत्त्वाची असते.
रोहित आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. फक्त ट्रेडमार्क पूलच्या फटक्याबद्दल त्याला किंचीत विचार करावा लागेल. या मालिकेत पूलचे फटके खेळत असतानाच रोहित दोनवेळा बाद झाला आहे.
रिषभ पंतला एकदा सूर सापडल्यानंतर मागे वळून पहावे लागत नाही आणि रविंद्र जडेजा सातव्या स्थानी उत्तम योगदान देत आला आहे. डावखुरा फिरकीपटू यापेक्षा फलंदाज म्हणूनच त्याला खेळवले जात असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
हेडिंग्ले गोलंदाजांना अनुकूल
हेडिंग्लेमधील वातावरण साधारणपणे थंड व पेसर्सना पोषक असेल, अशी अपेक्षा असून यामुळे भारतीय संघ पुन्हा एकदा चार मध्यम-जलद गोलंदाज खेळवेल, असे संकेत आहेत. साहजिकच, रविचंद्रन अश्विनला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागेल, असा होरा आहे. शार्दुल ठाकुर आता तंदुरुस्त आहे. मात्र, लॉर्ड्समध्ये कसोटी जिंकणाऱया मागील भारतीय संघात काहीही बदल करण्याविषयी कोहली अनुकूल असेल, असे वाटत नाही.
पहिल्या कसोटी सामन्यात खेळू न शकलेल्या इशांतने लॉर्ड्सवर दमदार मारा साकारला असून येथेही त्याच्याकडून भारताला भरीव अपेक्षा असणार आहेत. त्याने लॉर्ड्सवर दिलेले योगदान पाहता, इशांतला पसंती मिळेल, हे जवळपास निश्चित मानले जाते. शार्दुल तंदुरुस्त असला तरी याक्षणी संघात बदल होण्याची शक्यता अंधुक असेल.
सिराजमुळे गोलंदाजीला आणखी धार
अलीकडील कालावधीत भारतीय जलद-मध्यमगती गोलंदाजी जागतिक स्तरावर अव्वल दर्जाची ठरत आली असून मोहम्मद सिराजने लॉर्ड्स कसोटीत पाचव्या दिवसाच्या खेळात धारदार मारा साकारत आपल्या अचूकतेची उत्तम प्रचिती दिली आहे. भारताने यापूर्वी 2002 मध्ये या मैदानात शेवटचा सामना खेळला, त्यावेळी 1 डाव व 46 धावांनी ऐतिहासिक विजय साकारला होता. अर्थात, सध्याच्या संघातील एकाही खेळाडूला येथे खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे, येथे स्थानिक परिस्थितीशी ते कसे जुळवून घेतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सुर्यकुमार यादव.
इंग्लंड ः जो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करण, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, सकिब महमूद, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हर्टन, ऑलि पोप, ऑलि रॉबिन्सन.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 पासून.
विराट कोहलीसमोर बॅड पॅचमधून बाहेर येण्याचे आव्हान
एकीकडे, संघ उत्तम बहरात असताना कर्णधार विराट कोहली मात्र अद्याप बॅड पॅचवर मार्ग काढण्यासाठी बराच झगडत असल्याचे चित्र यापूर्वी दुसऱया कसोटी सामन्यात देखील दिसून आले. विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्यानंतर शतकाच्या निकषावर त्याची पाटी कोरीच राहिली. या मालिकेत त्याने 40 च्या घरात दोन-एकवेळा मजल मारली असली तरी आधुनिक क्रिकेटमधील या महान फलंदाजाकडून सातत्यपूर्ण फॉर्मची अपेक्षा गैर ठरत नाही.
मलानच्या समावेशाने इंग्लंडची चिंता मिटणार का?
दुसऱया कसोटी सामन्यातील पराभवामुळे खडबडून जागे झालेल्या इंग्लिश संघाने आता या मालिकेत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्पेशालिस्ट डेव्हिड मलानला तातडीने पाचारण केले आहे. पण, केवळ मलानचा समावेश केल्याने खराब फलंदाजीच्या समस्येचे समूळ उच्चाटन होणार का, हा खरा प्रश्न असेल. मलान या 3 वर्षात एकही कसोटी खेळलेला नाही. केवळ प्रथमश्रेणी क्रिकेटमधील उत्तम अनुभवाच्या बळावरच तो इंग्लंडची चिंता मिटवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
हसीब हमीद व रोरी बर्न्स सलामीला उतरतील आणि मलान तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरेल, असे संकेत असून सध्या या संघाची सर्व भिस्त केवळ जो रुटवरच राहिली आहे, हे प्रत्येक सामन्यात दिसून आले आहे.
जलद गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे बाहेर मार्क वूडने यापूर्वी वेगवान माऱयाच्या बळावर भारतीय फलंदाजांना सतावले असले तरी आता दुखापतीमुळे तो बाहेर फेकला गेला असल्याने इंग्लंडच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. वूडचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही खेळाडूसमोर दुखापतीची चिंता नसल्याचा निर्वाळा जो रुटने दिला आहे. जेम्स अँडरसन पूर्ण तंदुरुस्त असल्याचे रुटने येथे स्पष्ट केले









