बाजारपेठेत कचऱयाचे ढीग पडूनच : परिसरात पसरली अस्वच्छता
प्रतिनिधी / बेळगाव
शहरावासियांनी कोरोनाची धास्ती न बाळगता दिवाळी साजरी केली. चारही दिवस मोठे आनंदात घालविले. लक्ष्मीपूजन पण हौसेने साजरे केले. मात्र, त्यानंतर शहरात निर्माण झालेले कचऱयाचे ढीग दूर करण्यात महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे असंख्य ठिकाणी एकूण परिसर अस्वच्छ राहिला आहे.
दिवाळीच्या दिवसांत हार, फुले, आंब्याची पाने, केळीची रोपटी, तोरण यांची सजावट मोठय़ा प्रमाणात केली गेली. मात्र, पूजेनंतर हे सर्व साहित्य तसेच रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले आहे. निर्माल्य वेगळे करण्याइतका सुज्ञपणा दाखविला गेला नाही. परिणामी बाजारात सर्वत्र कचऱयाचे ढीग दिसत आहेत.
वास्तविक सण-समारंभाला विशेषतः लक्ष्मी पूजनादिवशी पूजा साहित्याचा वापर वाढतो. परंतु दुसरे दिवशी सर्व निर्माल्य बऱयाचदा तसेच फेकून देण्यात येते. मुख्य बाजारपेठेत तर केळीची झाडे आणि आंब्याची पाने यांचे ढीग साचलेले पाहायला मिळतात. दरवषीची ही समस्या आहे. परंतु महानगरपालिका त्या अनुषंगाने कोणतेही नियोजन करत नाही. परिणामी सर्वत्र दिवाळीच्या नंतर शहर अस्वच्छच राहते. महानगरपालिका याची दखल घेईल का? हा प्रश्न आहे.









