अखेर सात वर्षांनी मिळाला न्याय
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना आज पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.
मुकेश सिंह (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि विनयकुमार सिंह (31) अशी फासावर लटविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद हे एक दिवस आधीच मेरठ वरून दिल्लीच्या तिहार तुरूंगात पोहोचले होते. त्यांनी सकाळी 5.30 वाजता या आरोपींना फाशी दिली.
16 डिसेंबर 2012 ला वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱया तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिला मारहाण करुन विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले होते. उपचारादरम्यान, सिंगापूरमध्ये 29 डिसेंबर 2012 ला निर्भयाचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणातील 6 जणांना अटक करण्यात आली. त्यामधील एक अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली तर इतर पाच आरोपींची फाशी निश्चित झाली होती. त्यानंतर मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. त्यामुळे इतर चार आरोपींवर न्यायालयात खटला सुरू होता.
अखेर न्यायालयाने चौथे ‘डेथ वॉरंट’ काढत 20 मार्चला पहाटे साडेपाच वाजता त्यांची फाशी निश्चित केली. त्यानंतर आज दोषींना फाशी देण्यात आली.