मँचेस्टरमधील शेवटची कसोटी : विंडीजविरुद्ध पहिल्या दिवशी चहापानाअखेर 4 बाद 131
मँचेस्टर / वृत्तसंस्था
यजमान इंग्लंडने विंडीजविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात शुक्रवारी चहापानाअखेर 4 बाद 131 अशी डळमळीत सुरुवात केली. चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी ऑलि पोप 24 तर जोस बटलर 2 धावांवर खेळत होते. उभय संघातील 3 सामन्यांची ही मालिका 1-1 अशा बरोबरीत असल्याने या शेवटच्या कसोटीला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे.
शुक्रवारी या लढतीच्या पहिल्या दिवशी विंडीज कर्णधार जेसॉन होल्डरने नाणेफेक जिंकल्यानंतर यजमान संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि त्याच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत पहिल्या दोन्ही सत्रात यजमानांना जोरदार धक्के दिले. सलामीवीर डॉम सिबली (5 चेंडूत 0) पहिल्याच षटकात बाद झाला तर कर्णधार जो रुट (43 चेंडूत 20) उपाहाराच्या आधी धावचीत होत तंबूत परतला. त्यानंतर चहापानापर्यंत यजमान संघाची आणखी पडझड झाली आणि त्यांना अष्टपैलू बेन स्टोक्स (20), रोरी बर्न्स (57) हे मोहरे देखील गमवावे लागले.
इंग्लंडने या लढतीसाठी 4 जलद गोलंदाज व 1 फिरकीपटूला प्राधान्य दिले. यामुळे, स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सला चौथ्या स्थानी बढती मिळणार हे निश्चित होते. अर्थात, चहापानापूर्वीच स्टोक्सवर मैदानात उतरण्याची वेळ आली.
ढगाळ हवामान असल्याने विंडीजने नाणेफेक जिंकल्यानंतर लगोलग इंग्लंडला फलंदाजीला पाचारण करणे पसंत केले आणि जलद गोलंदाज केमर रोशने पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सिबलीला पायचीत करत पहिले महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. सिबली खातेही उघडू शकला नाही. चेंडू ऍक्रॉस खेळण्याचा प्रयत्न सपशेल फसल्यानंतर त्याला रिव्हय़ू घेण्याचीही गरज भासली नाही.
कर्णधार रुटने 59 चेंडूत 17 धावांची खेळी साकारत संयमावर अधिक भर असेल, असे दर्शवले. पण, एकेरी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्न त्याच्या अंगलट आला आणि धावचीत होत त्याला परतावे लागले. रोस्टन चेसचा थ्रो यावेळी निर्णायक ठरला. विंडीज जलद गोलंदाज शेनॉन गॅब्रिएल संघात होता. मात्र, धोंडशिरेच्या दुखापतीमुळे तो बराच काळ बाहेरच होता. सध्या ही मालिका 1-1 ने बरोबरीत असून साऊदम्प्टनमधील पहिली कसोटी जिंकणाऱया विंडीजचा इंग्लंडमध्ये 1988 नंतर प्रथमच मालिका जिंकण्याचा येथे प्रयत्न आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : 4 बाद 131 (ऑलि पोप नाबाद 24, जोस बटलर नाबाद 2, रोरी बर्न्स 147 चेंडूत 4 चौकारांसह 57, जो रुट 17, बेन स्टोक्स 43 चेंडूत 20. अवांतर 11. केमर रोश 2-35, रोस्टन चेस 1-1)









