पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेनेही धूळ चारली, भारत 6 गडय़ांच्या फरकाने पराभूत
दुबई / वृत्तसंस्था
फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर सपशेल अपयशी ठरलेल्या विद्यमान विजेत्या भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीत पाकिस्ताननंतर श्रीलंकेने देखील धूळ चारली आणि यामुळे संघाचे आव्हान संपुष्टात होण्याच्या मार्गावर पोहोचले. भारताने 8 बाद 173 धावा केल्यानंतर लंकेने शेवटच्या षटकापर्यंत झुंजार खेळ साकारत 19.5 षटकात 4 बाद 174 धावांसह 6 गडय़ांनी दणकेबाज विजय संपादन केला. लंकेचा हा सुपर-4 फेरीतील सलग दुसरा विजय आहे. अष्टपैलू कामगिरी करणाऱया दसून शनाकाला सामनावीराचा बहुमान मिळाला.

शेवटच्या 2 षटकात 21 धावांचे संरक्षण करण्याचे आव्हान असताना भुवनेश्वरने डावातील 19 व्या षटकात तब्बल 14 धावा दिल्या आणि त्यानंतर मागील सामन्यातील वादंगाच्या भोवऱयात राहिलेल्या अर्शदीपसमोर 6 चेंडूत 7 धावांचे संरक्षण करण्याचे कठीण आव्हान होते. ते त्याला पेलवले नाही.
प्रारंभी, लंकेतर्फे कुशल मेंडिस (37 चेंडूत 57) व पथूम निस्सांका (37 चेंडूत 52) यांनी 97 धावांची सलामी दिली. लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने 12 व्या षटकात 2 बळी घेत सामन्याचे चित्र पालटण्याचा प्रयत्न केला. रविचंद्रन अश्विनने दनुष्काला एका धावेवर बाद करत आणखी दडपण आणले. चहलने मेंडिसला यष्टीचीत करत आणखी एक यश मिळवले. मात्र, त्यानंतर लंकन कर्णधार दसून शनाका (नाबाद 33) व भानुका राजपक्ष (नाबाद 25) यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 64 धावांची भागीदारी साकारत भारताचे मनसुबे धुळीस मिळवले.
रोहित-सूर्यकुमारची अर्धशतकी भागीदारी
थत्पूर्वी, अर्धशतकवीर रोहित शर्माच्या 41 चेंडूतील 72 धावांच्या झुंजार खेळीच्या बळावर भारताने 20 षटकात 8 बाद 173 धावांपर्यंत मजल मारली. प्रारंभी, केएल राहुल अवघ्या 6 धावांवर बाद झाल्यानंतर भारताची खराब सुरुवात झाली. त्यातच विराट कोहली शून्यावर त्रिफळाचीत झाल्यानंतर संघाला आणखी एक धक्का बसला. पण, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी तिसऱया गडय़ासाठी 97 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारत डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
सूर्यकुमार यादवने शनाकाच्या गोलंदाजीवर तिक्षणाकडे झेल देण्यापूर्वी 29 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हार्दिक पंडय़ा (17), रिषभ पंत (17), दीपक हुडा (3), भुवनेश्वर कुमार (0) हे फलंदाजही स्वस्तात बाद होत राहिले. सलामीवीर रोहित शर्माने मात्र एक बाजू लावून धरत 41 चेंडूत 72 धावांची आतषबाजी केली. त्याच्या खेळीत 5 चौकार, 4 षटकारांचा समावेश राहिला. लंकेतर्फे मदुशनाकाने 24 धावात 3 तर करुणारत्ने व शनाका यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
धावफलक
भारत ः केएल राहुल पायचीत गो. तिक्षणा 6 (7 चेंडू), रोहित शर्मा झे. निस्सांका, गो. करुणारत्ने 72 (41 चेंडूत 5 चौकार, 4 षटकार), विराट कोहली त्रि. गो. मदुशनाका 0 (4 चेंडू), सूर्यकुमार यादव झे. तिक्षणा, गो. शनाका 34 (29 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा झे. निस्सांका, गो. शनाका 17 (13 चेंडूत 1 षटकार), रिषभ पंत झे. निस्सांका, गो. मदुशनाका 17 (13 चेंडूत 3 चौकार), दीपक हुडा त्रि. गो. मदुशनाका 3 (4 चेंडू), रविचंद्रन अश्विन नाबाद 15 (7 चेंडूत 1 षटकार), भुवनेश्वर कुमार त्रि. गो. करुणारत्ने 0 (2 चेंडू), अर्शदीप सिंग नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 8. एकूण 20 षटकात 8 बाद 173.
गडी बाद होण्याचा क्रम
1-11 (केएल राहुल, 1.5), 2-13 (विराट, 2.4), 3-110 (रोहित, 12.2), 4-119 (सूर्यकुमार, 14.2), 5-149 (पंडय़ा, 17.3), 6-157 (हुडा, 18.1), 7-158 (पंत, 18.3), 8-164 (भुवनेश्वर, 19.3).
गोलंदाजी
दिलशान मदुशनाका 4-0-24-3, महिश तिक्षणा 4-0-29-1, चमिका करुणारत्ने 4-0-27-2, असिथा फर्नांडो 2-0-28-0, वणिंदू हसरंगा 4-0-39-0, दसून शनाका 2-0-26-2.
श्रीलंका ः 19.5 षटकात 4 बाद 174 (पथूम निसांका 52, कुशल मेंडिस 57, भानुका राजपक्ष नाबाद 25, दसून शनाका 18 चेंडूत नाबाद 33. चहल 3-34, अश्विन 1-32).
पाचव्या चेंडूवर दोनवेळा संधी, पण, एकदा रिषभ पंत चुकला तर एकदा अर्शदीप सिंग!
लंकेला शेवटच्या 2 चेंडूत 2 धावांची आवश्यकता असताना अर्शदीपच्या चेंडूवर शनाका चकला होता. पण, यष्टीरक्षक रिषभ पंत मागे असल्याने शनाकाने एकेरी धावेसाठी कॉल दिला. यावेळी पंतने यष्टीचा थेट वेध घेतला असता तर राजपक्ष धावचीत होऊ शकला असता. पण, तसे झाले नाही. पुढे फॉलो थ्रूमध्ये अर्शदीपने चेंडू कलेक्ट करत नॉन स्ट्रायकर एण्डच्या यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला असता तर शनाका धावचीत झाला असता. पण, यावेळी अर्शदीपचा थ्रोही चुकला आणि लंकन फलंदाजांनी दोन धावा पूर्ण करत हा रोमांचक सामना आपल्या खिशात घातला!
आज पाकिस्तानने अफगाणला नमवले तर भारत स्पर्धेबाहेर
आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 फेरीत आज पाकिस्तानचा मुकाबला अफगाणविरुद्ध होत असून पाकिस्तानने ही लढत जिंकली तर भारताचे आव्हान संपुष्टात येईल. या परिस्थितीत भारत-अफगाण ही तिसरी व शेवटची साखळी लढत निव्वळ औपचारिक स्वरुपाची असणार आहे.









