मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : तज्ञांशी चर्चा करणार
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेल्या विकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यूसह सध्या असणाऱया नियमांबाबत शुक्रवारी फेरविचार करण्यात येईल. तज्ञांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे विकेंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यू यापुढेही जारी ठेवावेत की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
राज्यात जारी करण्यात आलेल्या विकेंड कर्फ्यूला हॉटेल मालकांसह विविध उद्योजक संघटना व काही भाजप नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी अधिकाऱयांची बैठक घेऊन चर्चा केली होती. शुक्रवारी पुन्हा बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोरोनाच्या तिसऱया लाटेत रुग्ण लवकर संसर्गमुक्त होत आहेत. त्यामुळे मागील सोमवारी कोविड मार्गसूचीतील नियम शिथिल करता येतील का?, याबाबत सरकारला सल्ला देण्याची सूचना तज्ञांना केली होती. शुक्रवारी होणाऱया बैठकीत तज्ञांकडून चित्र स्पष्ट होईल. त्यानुसार सरकार पुढील निर्णय घेणार आहे. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या प्रारंभी कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे. तोपर्यंत खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे बोम्माई म्हणाले.









