आपत्ती व्यवस्थापन ऍक्टनुसार केला गुन्हा दाखल
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या कहरमुळे जिह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. मात्र कायदा धाब्यावर बसवून हम करे सो प्रमाणे वागणार्यांना हॉटेल चालकांना महागात पडले आहे. कासकडे जाणार्या रस्त्यावर अनेक हॉटेल्स आहेत. त्यातील काही हॉटेल चालकांनी नियम मोडल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल चालकांचीही आता तंतरली आहे.
कास हे पुष्पपठार पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळावर लॉकडाऊन शिथील केल्यामुळे फिरायला जाणार्यांची संख्या वाढली आहे. तसेच तेथील हॉटेल चालकांनी आपली हॉटेल सुरु केली आहे. जिह्यात अजूनही आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा ते कास रोडवरील हॉटेल्स दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवले व हॉटेलमध्ये ग्राहक जेवणासाठी बसलेले दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यामध्ये किनारा हॉटेलचे आकाश जालिंदर उंबकर, कास हिल रिसॉर्टो शंकर राजाराम जांभळे, इगल हॉटेलचे प्रताप प्रदीप गरुड, ऋतुबंध हॉटेलचे पकंज श्रीधर भणगे, ब्ल्यू व्हॅलीचे संजय दत्तात्रय शिंदे, स्वराज्य हॉटेलचे संदेश हणमंत सपकाळ यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार भा. द. वि. स. 188नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.