प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावचे आर्थिक गणित हे येथील उद्योगांवर आधारलेले आहे. परंतु हे उद्योगच सध्या आजारी आहेत. लॉकडाऊन नंतर नवीन ऑर्डर मिळालेली नसल्यामुळे कामगारांचे पगार कसे द्यायचे असा प्रश्न उद्योगांसमोर आहे. अशा परिस्थितीतही कारखाने सुरू कसे ठेवायचे असा प्रश्न बेळगावच्या उद्योजकांसमोर आहे. यामुळे काही कामगारांना सुट्टय़ा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निम्या कामगारांवरच उद्योगाची धडधड सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर तब्बल सव्वा महिन्यानंतर चार मे पासुन पुन्हा कारखाने सुरू करण्यात आले. लॉकडाऊनपूर्वी घेण्यात आलेली ऑर्डर पूर्ण करण्यात आली. लघु उद्योगांबरोबरच मोठे उद्योगही मे महिनाभर चालले. परंतु जसजसे जुने काम संपत आले. तसतसे उद्योगांना चिंता पडू लागली. नविन ऑर्डर मिळत नसल्यामुळे कारखाने सुरू ठेवायचे की बंद असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.
बेळगावमधील उद्योग हे पुणे व मुंबई या मोठय़ा महानगरावर अवलंबून आहेत. बेळगावमध्ये 70 टक्के औद्योगिक उत्पादन हे ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत आहे. सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्यामुळे त्याचा थेट परिणाम बेळगावच्या उत्पादकांना बसला आहे. मोठे उद्योगच सुरू नसतील तर लहान उद्योगांना काम कोठून मिळणार ? काम नसल्यामुळे अनेक लघू उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.
काम कमी असल्यामुळे अनेक मोठय़ा कंपन्यांनी कामगारांना सुटय़ा दिल्या आहेत. त्याचबरोबर काहींनी आठवडय़ातुन काही दिवस काम सुरू ठेवले आहे. कारखान्यांमध्ये एकाच वेळी शेकडो कामगार काम करत असतात. त्यामुळे काही वेळा सोशल डिस्टंसिंग पाळणेही शक्मय नसल्यामुळे धोका पत्करून उद्योजकांनी कारखाने सुरू ठेवले आहेत. यामुळे निम्म्या कामगारांवरच सध्या औद्योगिक क्षेत्राची धडधड सुरू असल्याचे चित्र दिसुन येत आहे.









