प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी- निपाणी या राज्य महामार्गावर सरवडे (ता. राधानगरी) येथील खोराटे विद्यालयाजवळ एसटी व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत मोटरसायकलवरील मायलेकरांचा जागीच अंत झाला. विठ्ठल धुळाप्पा खतकर (वय ४३) व झिंबाबाई धुळाप्पा खतकर (वय ७५)अशी मयतांची नावे असून ते कागल तालुक्यातील भडगांवचे आहेत. अपघाताची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दुपारी साडेबाराच्या सुमारास राधानगरी आगाराची एसटी क्रमांक एम. एच- १२- ई एफ ६४८८ ही गाडी मुदाळतिट्टयाकडे चालली होती. तर कागल तालुक्यातील भडगावचे विठ्ठल खतकर व त्यांच्या आई झिंबाबाई मोटरसायकल क्रमांक एम एच-०९ -२९०१ या स्प्लेंडर गाडीवरून गावाकडून दुर्गमानवाडकडे निघाले होते. सरवडे येथे खोराटे विद्यालयाजवळ एसटी व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाली. त्यामध्ये मोटरसायकल चालक विठ्ठल व मागे बसलेली त्यांची आई झिंबाबाई रस्त्यावर फेकली गेले. धडक जोराची असल्याने दोघेही जागीच ठार झाले.









