, स्टँडा मेमोरियल बॉक्सिंग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बल्गेरियातील सोफिया येथे सुरू असलेल्या 73 व्या स्टँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या महिला बॉक्सर्स नितू (4< किलो गट) व अनामिका (50 किलो गट) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.
नितूने रशियाच्या चुमगालाकोव्हा लुलियावर 5-0 अशी एकतर्फी मात केली तर अनामिकाने स्थानिक खेळाडू चुकानोव्हा लॅटिस्लाव्हावर 4-1 अशा गुणफरकाने विजय मिळवित आगेकूच केली. नितू व अनामिका यांच्या पुढील लढती अनुक्रमे इटलीची रॉबर्टा बोनाटी व अल्जेरियाची रौमायसा बॉलेम यांच्याशी होणार आहेत. शिक्षा (54 किलो गट) व आकाश (पुरुष 67 किलो गट) यांना मात्र पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. शिक्षाला कझाकची माजी वर्ल्ड चॅम्पियन व विद्यमान आशियाई सुवर्णविजेती दिना झोलामनकडून तर आकाशला जर्मनीच्या डेनियल क्रॉटरकडून पराभव स्वीकारावा लागला. दोघेही 0-5 याच फरकाने पराभूत झाले.
मंगळवारी उशिरा भारताची युवा वर्ल्ड चॅम्पियन अरुंधती चौधरी (71 किलो) व राष्ट्रीय चॅम्पियन रोहित मोर (57 किलो) यांच्यासह अन्य सहा मुष्टियोद्धे आपल्या मोहिमेला सुरुवात करीत आहेत.
या स्पर्धेत 36 देशांच्या 450 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला असून त्यात आंतरराष्ट्रीय पॉवरहाऊस मानल्या जाणाऱया कझाकस्तान, इटली, रशिया, फ्रान्स यांच्या खेळाडूंचा समावेश आहे. भारताने या स्पर्धेसाठी 17 जणांचे पथक पाठविले असून त्यात सात पुरुष व दहा महिलांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या मागील आवृत्तीत भारताने दोन पदके मिळविली होती. दीपक कुमारने रौप्य व नवीन बूराने कांस्यपदक मिळविले होते.









