प्रतिनिधी / मडगाव
नावेली मतदारसंघात नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे आत्ता हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली. या आरोग्य केंद्राचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असून त्याला मान्यता मिळालेली आहे. या ठिकाणी 10 ते 15 खाटांची व्यवस्था केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
नावेली आरोग्य केंद्राचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर करावे अशी मागणी स्थानिक आमदार लुईझिन फालेरो यांनी केली होती व तसा प्रस्ताव आरोग्य खात्याला सादर केला होता. त्याप्रमाणे, हा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समोर ठेवण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्र्यांनी घेतला लसीकरणाचा आढावा
काल गुढी पाडवा, त्यामुळे सार्वजनिक सुट्टी तरी सुद्धा सुट्टीच्या दिवशी गोव्यात लसीकरणाची मोहीम चालू होती. त्याचा आढावा घेण्यासाठी काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी धारबांदोडा, फोंडा, शिरोडा, नावेली, असोल्णा व हॉस्पिसियो इस्पितळाला भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. आपण भेट दिलेल्या सर्व ठिकाणी डॉक्टर, नर्सेस तसेच इतर कर्मचारी योग्यपद्धतीने काम करीत असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
गोव्यात कोरोना लसीकरणाची जागृती बऱयापैकी झालेली आहे. त्यामुळे लोक स्वताहून लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात तसेच हॉस्पिटलांनी भेट देतात. सद्या गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज असून फोंडा जिल्हा इस्पितळात अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
कोरोना महामारीचा गेल्या वर्षीचा कालावधी होता. त्यातून बराच अनुभव मिळालेला आहे. या अनुभवाचा फायदा आत्ता होत आहे. लोकांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होत असतो. आज डॉक्टर व इतर कर्मचारी दिवस-रात्र काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मंत्री म्हणून त्यांना आदेश देऊन चालणार नाही. डॉक्टर व नर्सेस तसेच इतर सर्व कर्मचाऱयांचे सहकार्य हे खुपच महत्वाचे असल्याचे आरोग्यमंत्री श्री. राणे म्हणाले.
लसीकरणाचा दुसरा डोस देण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आपण स्वता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे बोलणी केलेली आहे व लसीकरणाचा पुरवठा उलपब्ध होणार आहे. आज लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळत आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यापासून पक्षाचे इतर कार्यकर्ते लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करीत असल्याचे आरोग्यमंत्री श्री. राणे यांनी सांगितले.
आपल्या आई-वडिलांना जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाला होता, तेव्हा त्यांच्यासाठी नव्या पद्धतीचा प्रोटोकॉल वापरण्यात आला होता. तोच प्रोटोकॉल राज्यातील इतर जनतेला देखील मिळायला पाहिजे व त्यादृष्टीकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.