प्रतिनिधी / शिरोळ
अमर रहे अमर रहे वीर जवान राजेंद्र पाटील अमर रहे || वीर जवान तुझे सलाम || अशा घोषणा व अश्रू नयनी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत भडाग्नी देण्यात आला. कुटवाड कनवाड घालवाड यास अन्य भागातील नागरिक सहभागी झाले होते.
भारतीय सैन्यदलात सेवा बजावणारे शिरोळ तालुक्यातील कुटवाड येथील नायब सुभेदार जवान राजेंद्र धोंडीराम पाटील वय वर्षे 43 यांचे दिल्ली इथे कर्तव्य बजावत असताना 16 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आज सकाळी आठ वाजता त्यांचा पार्थिव देह कुटवाड गावी आल्यानंतर अनेकांनी हंबरडा फोडला अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
जवान पाटील यांचे पार्थिव मराठी शाळेच्या मैदानात अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून जवान राजेंद्र पाटील अमर रहे अशा घोषणा देत अंत्य यात्रा काढण्यात आली. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, नायब सुभेदार पी. सी. ठोकळ, तहसीलदार अर्पणा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, माजी आमदार उल्हास पाटील, सैनिक फेडरेशनचे विजय पाटील, उत्तम वेताळ यांच्या सह आजी – माजी सैनिक यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली एक मुलगा दोन भाऊ भाऊजय असा परिवार आहे.