कोकणवासीयांनी विरोध कायम ठेवावा : प्रा. महेंद्र नाटेकर यांचे आवाहन
प्रतिनिधी / कणकवली:
महाभयंकर रिफायनरीमुळे राजापूर तालुक्मयातील नाणार, कात्रादेवी, तारळ, चौके, उपळे तसेच देवगड तालुक्मयातील गिर्ये, पुरळ ही गावेच नव्हे तर संपूर्ण कोकणच उद्ध्वस्त होणार असल्याने तमाम कोकणवासियांनी या विनाशकारी प्रकल्पाला कडाडून विरोध केला पाहिजे, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रणेते प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे.
स्वतंत्र कोकणची सभा येथील कार्यालयात आयोजित केली होता. यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. यावेळी जे. जे. दळवी, वाय. जी. राणे, दिलीप लाड, ए. आय. चिलवान, प्रा. सुभाष गोवेकर, प्रकाश अधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
14 गावातील 3300 कुटुंबे विस्तापित होण्याची भीती
प्रा. नाटेकर म्हणाले, आखाती देशातून सुमारे सहाशे मेट्रिक टन कच्चे खनीज तेल आयात करून त्यांच्यावर नाणार येथे प्रक्रिया करून त्यातून पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन इत्यादी तयार केले जाणार आहे. वार्षिक सहा कोटी टनाची ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी असेल. हा प्रकल्प 14 गावांच्या जमिनीवर असल्याने सुमारे 3300 कुटुंबे विस्थापित होतील. या रिफायनरीसाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यावर दररोज 18 हजार टन कोळसा जाळून तेल शुद्धिकरण केले जाणार आहे. त्यामुळे 600 टन राख निर्माण होऊन ती वाऱयाबरोबर सर्वत्र पसरणार आहे.
रिफायनरीतून बाहेर पडणाऱया वायू प्रदूषकांमुळे धोका
रिफायनरीमधून दरवर्षी कोटय़वधी मेट्रीक टन कार्बनडाय ऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड हे विषारी वायू बाहेर पडून ते संपूर्ण कोकण व्यापून टाकतील. रिफायनरीतून बाहेर पडणाऱया वायू प्रदूषकांमुळे सजीव सृष्टीवर घातक परिणाम होतात हे माहूल, मथुरा, कोची, विशाखापट्टणम, मंगलोर इत्यादी ठिकाणच्या रिफायनरींच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. कोकणातील काजू, आंबा, बागायती बरोबरच पर्यावरणावर विपरित परिणाम झाल्याने येथील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार पर्यटन व्यावसायीक इत्यादींवर मराठवाडय़ाप्रमाणे आत्महत्या करण्याची पाळी येईल, असे प्रा. नाटेकर यांनी म्हटले आहे.
कोकण भकास करू नका! कोकण विकास करायचा नसेल तर नका करू, पण निदान कोकण ‘भकास’ तरी करू नका, असे सांगत प्रा. नाटेकर शेवटी म्हणाले, हे विनाशकारी प्रकल्प केंद्र सरकार लादत नसून राज्य सरकार लादत आहे. म्हणूनच आम्ही स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करत आहोत. राज्य निर्मिती केल्यास रिफायनरी, अणुऊर्जा, औष्णीक इत्यादी विनाशकारी प्रकल्प आम्ही कोकणात येऊ देणार नाही, असेही प्रा. नाटेकर शेवटी म्हणाले.









