वार्ताहर /पणजी
अ.भा. मराठी नाटय़ परिषद ठाणे शाखा आयोजित खुल्या ऑन- लाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाला जाहीर झाला असून गोव्याच्या शनया महाले हिने तीन हजार रुपये आणि प्रमाणपत्रासह प्रथम पुरस्कार पटकावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑन- लाईन पद्धतीनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत गोव्यासह महाराष्ट्राच्या कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा सर्व भागातून एकुण 47 स्पर्धकांनी भाग घेतला. अंतिम फेरीसाठी आठ जणांची निवड करण्यात आली होती. त्यांचे सादरीकरण नाटय़ परिषद, ठाणे शाखेच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.
या स्पर्धेत औरंगाबादचा सिद्धेश्वर थोरात याने द्वितीय तर ठाण्याच्या पूनम कयाळ हिने तृतीय पारितोषिक मिळवले. तर ईश्वरी निकम (पुणे) अन्वीत हर्डीकर (पुणे) आणि विपुल बी.(जुईनगर, नवी मुंबई) यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी भागवत आणि लोकप्रिय चरित्र अभिनेते सुहास गोडसे यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये समन्वयक महेश सावंत पटेल आणि आदित्य संभुस यांच्यासह शाखेच्या आयटी सेलने महत्त्वाची भूमिका बजावली, असे संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुख श्रृतिका कोळी मोरेकर यांनी सांगितले.
ठाणे शाखेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार मानून विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.
पहिल्या तीन विजयी स्पर्धकांना पारितोषिकांची रक्कम तसेच सर्व स्पर्धकांना प्राविण्य वा सहभाग प्रमाणपत्र ऑन लाईन पाठवण्यात येतील. शनया महाले ही नामवंत नाटय़कलाकार नीले महाले याची कन्या असून उगवे- पेडणे येथील रहिवासी आहेत. 10 वीपर्यंतचे शिक्षण पणजीतील पिपल्स हायस्कूलमध्ये झाले असून सध्या ती मिरामार येथील धेंपो कालेज सायन्स मध्ये शिकत आहे.









