नवीन पदावर तातडीने रूजू होण्याचे आदेश जारी
प्रतिनिधी /पणजी
गोवा नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांना नवीन पदावर तातडीने रूजू होण्यास बाजावले आहे. असा आदेश सरकारने जारी केला आहे.
राज्यपालांचे अतिरिक्त सचिव असलेले अमरसेन राणे यांना गोवा मानवी हमक्क आयोगाचे सचिवालय देण्यात आले असून कोणताही पदभार नसलेल्या श्रीनाथ कोठावळे यांना गृह खात्याचे अतिरिक्त सचिव नेमण्यात आले आहे. तेथे कार्यरत असलेल्या संध्या कामत यांना रवींद्र भवनाचे (मडगाव) सदस्य सचिव पद देण्यात आले आहे.
दक्षिण गोवा जिल्हय़ाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गौरीश कुट्टीकर यांची दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या सीईओपदी बदली केली आहे. मडगाव रवींद्र भवनचे सदस्य सचिव असलेले मेघनाथ परब यांना सार्वजनिक तक्रारी खात्याचे संचालक नेमण्यात आले आहे. कोणतेही पद नसलेल्या सुधीर केरकर यांना तुरुंग अधीक्षकपद देण्यात आले आहे.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे सीईओ गौरीश शांखवाळकर यांना राज्यपालांच्या संयुक्त सचिव पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रशासकीय संचालक अजित पंचवाडकर यांना दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून दुसरा ताबा दिला आहे.








