प्रतिनिधी/ चिपळूण
पंतप्रधान मोदी व भाजपा सरकारला प्रत्येक स्तरावर मिळणारे यश कॉंग्रेस, माओवादी व शहरी नक्षलींना अडचणीचे झाले आहे. त्यामुळे देशातील मुस्लिमांना भडकवून दंगली घडवण्याचे काम केले जात असून हे करणारे सर्वजण देशदोही आहेत, असा गंभीर आरोप भाजपाचे प्रवक्ते, म्हाडाचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच 70 वर्षे कुजत ठेवलेले सर्व प्रश्न कितीही विरोध झाला तरी देशाच्या हितासाठी मार्गी लावले जातील, असे स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, इतकी वर्षे प्रलंबित राहिलेला तिहेरी तलाक, राम मंदिर, सर्जिकल स्ट्राईक असे अनेक प्रश्न भाजपाच्या कारकीर्दीत मार्गी लागले. याला विरोध होऊन देशात जातीय दंगली होतील, आरएसएस, भाजपवाले आनंदोत्सव साजरा करून देशात अशांतता पसरवतील, असे या सर्वांना वाटत होते. मात्र तसे काहीही झाले नाही. त्यामुळेच नागरिकत्व कायदा पुढे करून देशातील शांतताभंग केली जात आहे. मुळातच 1947 साली महात्मा गांधी यांनी या देशात राहणाऱयाला नागरिकत्व मिळाले पाहिजे, असे म्हटले होते. त्यानंतर 1950 साली पंडित जवाहर नेहरू, 2003 साली मनमोहन सिंग, कम्युनिस्ट कमिटीचे भुवेश गुप्ता अशा अनेकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. असे असताना आता त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी होताना नेमका विरोध का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना या देशातील सांस्कृतिक मूल्ये, महापुरूष, शांतता याच्याशी काहीही देणेघेणे नसल्याने ते ही अराजकता माजवत आहेत. निर्वासितांना नागरिकत्व मिळणार आहे. मात्र अनेक घुसखोर बांगलादेशी व अन्य व्यक्तींनाही नागरिकत्व दिले पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. मात्र या मागे केवळ त्यांच्या मतांचे गणित आहे. त्यामुळे ते कदापीही मान्य केले जाणार नाही. या देशातील मुस्लिमांना कोणताही धोका नाही. भाजपने हिदू-मुस्लिम असा भेदभाव कधीही केला नसून करणारही नसल्याचे चव्हाण यांनी सागितले.
काँग्रेसने देशात 70 वर्षे धर्मशाळा चालवली. त्यामुळे देशाचे वाटोळे लागले. मात्र आता भाजपा असे होऊ देणार नाही. भारतीयांच्या हिताचे त्यांनी इतकी वर्षे कुजत ठेवलेले सर्व प्रश्न कितीही विरोध झाला तरी मार्गी लावले जातील, असे सांगतानाच काही वर्षांनी भाजपाने केलेले चांगलेच होते, असे सर्व भारतीय बोलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सुधीर भागवत, तालुकाध्यक्ष सतीश मोरे, प्रशांत शिरगावकर, रामदास राणे, शहराध्यक्षा वैशाली निमकर, नगरसेवक विजय चितळे आदी उपस्थित होते.









