प्रतिनिधी / नागठाणे :
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना साथरोगाने सातारा जिल्ह्याला जेरीस आणले असतानाच नागठाणे (ता.सातारा) व परिसरातील गावांमध्ये डेंग्यूची साथ आल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अन्य साथीचे रोगही उदभवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
कोरोना साथीने सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल केले आहे. नागठाणे परिसरातील गावांमधूनही मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, अनेकांचा मृत्यूही झाला आहे. या साथीमुळे जनतेत भीतीचे वातावरण असतानाच आता परिसरातील गावांमधून डेंग्यूच्या साथीनेही डोके वर काढले आहे. नागठाणेसह साताऱ्यातील खासगी रुग्णालयातून तसेच सरकारी रुग्णालयातही अनेक डेंग्यूचे रुग्ण आजमितीला उपचार घेत आहेत. त्यातच कोरोनातून बाहेर पडलेल्या रुग्णांना डेंग्यूची लागण लवकर होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिसरातील अनेक गावांमध्ये डेंग्यूचे रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या साथीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.









