आयोडिनने कोरोना संपविणे शक्य असल्याचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे. वैज्ञानिकांनुसार नाक आणि तोंडाला आयोडिनने साफ केल्यास कोरोना संसर्ग रोखला जाऊ शकतो. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कुल ऑफ मेडिसीनने हे स्वतःच्या संशोधनामध्ये मांडले आहे. 0.5 टक्के कंसंट्रेशनयुक्त आयोडिन सोल्युशनमध्ये जेव्हा कोरोना विषाणू सोडण्यात आला तेव्हा तो 15 सेकंदांत नष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले.
आयोडिनने सफाई करून विषाणूपासून बचाव केला जाऊ शकतो आणि कोरोनाला फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जाऊ शकतो. असे केल्यास रुग्णाची स्थिती नाजूक होण्यापासून वाचू शकते असे संशोधकांनी म्हटले आहे.
आयोडिन काय करणार?
मानवी नाकात सर्वाधिक एसीई2 रिसेप्टर्स असतात, जे कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत करतात. बहुतांश प्रकरणांमध्ये विषाणूचा प्रवेश नाक किंवा तोंडातूनच होतो. विषाणूला तेथेच रोखण्यासाठी क्लीनिकल ट्रायलमध्ये नाक आणि तोंडाच्या सफाईवर भर देण्यात आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधकांनी हे समजाविण्यासाठी आयोडिनची तीन अँटीसेप्टिक सोल्युशन्स (पीव्हीपी-1) तयार केली. यात आयोडिनचे प्रमाण 0.5 टक्के, 1.25 टक्के आणि 2.5 टक्के ठेवण्यात आले. 0.5 टक्के सोल्युशनमध्ये विषाणू 15 सेकंदांत नष्ट झाल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
याचबरोबर या विविध सोल्युशन्समध्ये 70 टक्के इथेनॉल टाकून 15 सेकंद आणि 30 सेकंदांनंतर कोरोनावर प्रभाव पाहण्यात आला. प्रयोगात इथेनॉल कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्यास उपयुक्त दिसून आला नाही. कोरोनाला आयोडिनसोबत ठेवल्यास विषाणूला नष्ट करण्यासाठी 15 सेकंद पुरेसे असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.
एअरोसॉल अन् डॉपलेट्सवर नियंत्रण
रुग्णांना आयोडिन सोल्युशनद्वारे नाक धुण्याची योग्य पद्धत डॉक्टरांनी सांगणे गरजेचे आहे. असे केल्यास तोंड किंवा नाकातून बाहेर पडणारे कोरोनाचे एअरोसॉल किंवा ड्रॉपलेट्सद्वारे होणाऱया संसर्गाचा धोका कमी केला जाऊ शकतो असे संशोधकांनी सांगितले आहे.









