नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. रविवारी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजप नेत्यांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे सध्या संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला जात असताना तिरंग्यावर भाजपने पक्षाचा झेंडा ठेवला होता. यावरुन विरोधकांनी नाराजी जाहीर केली असून संताप व्यक्त करत नव्या भारतात हे चालतं का ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
युथ काँग्रेसचे श्रीनिवास बीव्ही यांनी फोटो ट्वीट करत नव्या भारतात पक्षाचा झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का? असा सवाल विचारला आहे. भाजपाचा झेंडा तिरंग्याच्या वरती! स्वयंघोषित राष्ट्रभक्त तिरंग्याचा आदर करत आहेत की अपमान? अशी विचारणा युथ काँग्रेसने ट्विटरवरुन केली आहे.
भाजपने ट्वीट केलेल्या फोटोत कल्याण सिंह यांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळलेलं दिसत आहे. यावेळी तिरंग्यावर अर्ध्या भागात भाजपाचा झेंडाही दिसत आहे. यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांनी लखनऊमध्ये दाखल होत कल्याण सिंह यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह हे चार जुलैपासून लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल होते. अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.गेल्या दोन दिवसांपासून कल्याण सिंह यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली. कल्याण सिंह हे राजस्थानचे राज्यपाल देखील होते. याशिवाय, ते भाजपचे संस्थापक नेते होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून अनेक ज्येष्ठ नेते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा समावेश आहे.