चिपळुणातील प्रकार, भाजपपाठोपाठ महाविकास आघाडीनेही केले उद्घाटन, लोकार्पणाचा प्रशासकीय कार्यक्रम लवकरच
प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळूण नगर परिषदेने अनेक वर्षांनी अत्याधुनिक अग्निशमन बंब खरेदी केला असला तरी या बंबाने मात्र उद्घाटनावरून राजकीय आग लावली आहे. सोमवारी भाजपने, तर मंगळवारी महाविकास आघाडीने त्याचे उद्घाटन केले आहे. असे राजकीय वातावरण तापले असतानाच त्याचा लोकार्पणाचा प्रशासकीय कार्यक्रम लवकरच होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आगीसह अन्य कोणत्याही दुर्घटना घडल्यास उपयोगी पडावा म्हणून अनेक वर्षांनी नगर परिषदेने हा बंब खरेदी केला आहे. मध्यंतरी त्याच्या किंमतीवरून राजकारण रंगले होते. त्यामुळे त्याची खरेदी शासनाच्या जीएम पोर्टलवरून करण्यात आली. त्यामुळे नगर परिषदेचे तब्बल 14 लाख रूपये वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र असे असले तरी ताफ्यात दाखल होताच या बंबाने पहिल्यांदा राजकीय आग लावली आहे.
नगर परिषदेतील राजकीय गणिते सध्या बदलली आहेत. वर्षभरापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा येथे जन्म झाला आहे. त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना प्रत्येक कामात कात्रीत पकडण्याचा प्रयत्न या आघाडीकडून होताना दिसतो. त्यामुळे भाजप तसा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे हा बंब सोमवारी दाखल होताच नगराध्यक्षा खेराडे यांनी सहकारी नगरसेवकांसह त्याचे उद्घाटन केले. यावरून लगेचच राजकारण तापण्यास सुरूवात झाली. हा बंब सर्वांमुळे आला असल्यामुळे त्याचे उद्घाटन करण्याचा अधिकार एकाच पक्षाला कसा, असा प्रश्न महाविकास आघाडीने प्रशासनाला विचारला. यावर प्रशासकीय कार्यक्रम होणे बाकी आहे इतकेच उत्तर त्यांना देण्यात आले.
त्यामुळे मंगळवारी महाविकास आघाडीने आपल्या पक्षांच्या प्रमुखांना बरोबर घेऊन या बंबाचे पुन्हा उद्घाटन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, काँगेसचे गटतेने सुधीर शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते बिलाल पालकर, शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ, नगरसेवक शशिकांत मोदी, कबीर काद्री, मनोज शिंदे, करामत मिठागरी, नगरसेविका स्वाती दांडेकर, सई चव्हाण, संजीवनी शिगवण, रश्मी गोखले, सुषमा कासेकर, सफा गोठे, मिलिंद कापडी, महमद फकीर, राजू जाधव, फैसल पिलपिले आदी उपस्थित होते.
एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी बंबाच्या उद्घाटनाची घाई करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रशासनाने मात्र प्रशासकीय लोकार्पणाचा कार्यक्रम लवकरच होणार असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनाच आमंत्रित केले जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला हे सर्वजण उपस्थित राहणार की नाहीत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









