छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे यांची उपस्थिती : राज्यातून समन्वयकही राहणार उपस्थित : तुंर्भेतील माथाडी भवनमध्ये आयोजन
प्रतिनिधी/मुंबई, कोल्हापूर
मराठा क्रांती मोर्चासह विविध मराठा संघटनांची राज्यस्तरीय बैठक नवी मुंबईत बुधवारी (7 ऑक्टोबर) आयोजित करण्यात आली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर राज्यात मराठा समाजात निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विविध महत्वाच्या मुद्दÎांवर चर्चा होणार असून कठोर निर्णय देखील घेतले जाण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील तुंर्भे येथील स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी कामगार संघटनेच्या माथाडी भवनमध्ये बुधवारी सकाळी 11 वाजता बैठकीला प्रारंभ होईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने होणाऱया या बैठकीला उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोन छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चासह विविध मराठा संघटनांचे समन्वयक उपस्थित राहणार आहे. बैठकीतील निर्णयांकडे राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
विविध मुद्यावर चर्चा होणार : नरेंद्र पाटील
बैठकीविषयी माहिती देताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले, आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा 11 ऑक्टोबरला होणाऱया परीक्षेला बसलेल्या मराठा विद्यार्थ्याचे नुकसान होणार आहे. ही परीक्षा स्थगिती करण्याची मराठा विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने जाहीर केलेल्या पोलीस भरतीबाबतही स्थगितीची मागणी आहे. 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासंदर्भात बैठक घेतली. या सर्व बाबतीतील कोणतीही माहिती, प्रतिसाद मराठा समाजाला मिळालेला नाही. त्यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. शेजारच्या राज्यातील एका समाजाला आरक्षण देण्यात आले होते. पण त्याला स्थगिती मिळाल्यानंतर त्या राज्याने संबंधित समाजाला आर्थिक सवलती दिल्या. त्याप्रमाणे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत आर्थिक सवलती देण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा बैठकीत होणार आहे, असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
`मातोश्री’ परिसरात कडेकोट बंदोबस्त
मराठा क्रांती मोर्चाने एमपीएससीच्या परीक्षा स्थगिती करण्याची मागणी करताना प्रसंगी मुंबईत मातोश्रीवर धडक मारून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांचे निवासस्थान असणाऱया मातोश्री परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.