कोरोनाने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे आणि परिणामी सुरू झालेल्या लॉकडऊनमुळे सगळ्यांच्याच जगण्याची परिमाणं बदलली. घरातली कामं फक्त महिलांनीच करावीत हा अलिखित नियम हळूच विस्मृतीत गेला. याच काळात काही सामान्य महिलांनी असामान्य कामं करून दाखवली. पण लॉकडाऊनच्यां काळात स्वतःचं तसंच कुटुंबियांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याचं कामही त्यांना करायला लागणार आहे. घोषित-अघोषित लॉकडाउन काही काळ राहील. आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येईल. पुन्हा रोजची धावपळ सुरू होईल. आपल्यातली नात्याची घट्ट वीण सुटू द्यायची नसेल तर दोघांनीही एकमेकांना जपायला हवं. एकमेकांच्या भावभावना समजून घ्यायला हव्यात. दोघांनीही सामंजस्याने संसाराचा गाडा हाकायला हवा. आपल्याला घरकामात मदत करण्यासाठी महिलांनीही पुरुषांना आणि मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं. आता काळ बदलतोय. भेदभाव दूर होत चालला आहे. कोरोनाविरोधातली ही लढाई महिलाही सक्षमपणे लढत आहेत. डॉक्टर, पोलीस, परिचारिका, रुग्णालयातल्या कर्मचारी वर्गापासून अगदी सर्वसामान्य गृहिणींनीही कोरोनाविरोधातल्या या लढय़ात तोलामोलाची साथ दिली. अनेक महिलांनी मास्क शिवण्याचं काम हाती घेतलं. अनेकींनी गरीबांना अन्नदान केलं. लॉकडाउनमुळे हाल सोसणार्या मुक्या जनावरांना आधार दिला. अनेक मैल चालत जाणार्या मजूर कुटुंबांना मदतीचा हात दिला. सेवाभावी वृत्तीची अशी असंख्य उदाहरणं आपल्यासमोर आहेत. या तमाम महिलावर्गाला सलाम करायलाच हवा. मुलाबाळांपासून, कुटुंबापासून लांब राहून कोरोनाशी दोन हात करणार्या महिला आणि त्यांच्या पाठीशी
ठामपणे उभे असणारे कुटुंबिय यांचा त्याग खरंच खूप मोठा आहे. कोरोनामुळे आज मानसिक आरोग्य धोक्यात आलं आहे. स्वतःसह आपल्या कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्याची मोठी जबाबदारी महिलांवर आहे. लॉकडाउनच्या काळात दिनक्रम बदलल्यामुळे झोपेचं चक्र बदललं आहे. सकाळी उठण्याची घाई नसल्यामुळे जागरणं होत आहेत. मात्र शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी पुरेशी झोप घ्यायला हवी. त्यामुळे जागरण न करता वेळेत झोपून लवकर उठण्यावर भर द्यायला हवा. या काळात आणि पुढेही नियमित व्यायाम गरजेचा आहे. व्यायामामुळे शरीरात ऊर्जेचा संचार होतो. रक्ताभिसरण सुधारतं आणि निरोगी राहता येतं. नियमित योगासनं केल्यामुळेही मानसिक आरोग्य चांगलं राहू शकतं. सध्या ऑनलाईन योगा क्लास सुरू आहेत. तुम्ही अशाच एखाद्या योगा क्लासला जाऊ शकता. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य राखायचं असेल तर पौष्टिक आहार घ्यायला हवा. रिकामं बसण्यापेक्षा स्वतःचं मन रमवायचा प्रयत्न करायला हवा. छंद जोपासायला हवेत. मुलांनाही वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त ठेवायला हवं. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करा. घरात रहावं लागत असलं तरी एकटं राहू नका. स्वतःला घरातल्या खोलीत बंद करू नका. यामुळे एकटेपणाची आणि नकारात्मक भावना बळावते. कुटुंबियांशी गप्पा मारा. एकत्र स्वयंपाक करा. रूसवेफुगवे दूर करण्याची संधी या लॉकडाउनने आपल्याला दिली. आपण एकमेकांच्या अधिक जवळ आलो आहोत. प्रत्यक्ष भेटू न शकणारे कुटुंबिय, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधले कर्मचारी झूम किंवा इतर ऍप्सच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहेत. सोशल मीडियाने नाती दूर झाली आहेत असं कितीही म्हटलं तरी आज हाच सोशल मीडिया एकमेकांना भेटण्याची, व्यक्त होण्याची संधी देतोय. लॉकडाउनच्या काळातली ही जवळीक यापुढेही टिकून राहील आणि एकमेकांमधला जिव्हाळा उत्तरोत्तर वाढावा यासाठी प्रयत्न करू या.
Previous Articleसायंकाळी मोबाईलवर वाजतो सायरन.. मग घराबाहेर पडण्यास मनाई
Next Article स्वतःचा आजार विसरून कोरोनाग्रस्तांच्या सेवेत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









