रत्नागिरी जिल्ह्य़ातील वंचितांकडे बविआने वेधले लक्ष
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्हय़ात हातावर पोट असलेले ग्रामीण भागातील हजारो मोलमजुरी करणारा वर्ग शासनाच्या मोफत धान्य पुरवठा योजनेपासून वंचित राहिला आहे. मुळ रेशनकार्डवरील नाव कमी करून नव्याने रेशनकार्ड मिळण्यासाठी तहसीलदारस्तरावर अर्ज केलेले असताना गेल्या 3 महिन्यांपासून नवीन रेशनकार्ड मिळालेली नाहीत. या लाभार्थ्याची नावे कोणत्याही सर्वेक्षणात न आल्याने अन्नधान्यापासून वंचित आहेत. या सर्व स्थानिक रहिवासी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण तहसीलदार स्तरावर होऊन त्यांना प्रत्येक महिन्याचे धान्य व मोफत धान्य पुरवठा करावा, अशी मागणी बहुजन विकास आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे गेल्या 22 मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे उदरनिर्वाह थांबले आहेत. जनतेच्या हितासाठी लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे व त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. पण रत्नागिरी जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे शेती, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असतात. हातावर पोट असणारे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने अंत्योदय व नियमात बसणाऱया केशरी कार्डधारकांना मोफत धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परराज्यातील मजुरादारांचीही कुठलीही उपासमार होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्था व शासनाच्यावतीने योग्य खबरदारी घेतली आहे.
पण जिल्हय़ातील एकत्रित कुटुंबातील रेशनकार्डधारकांनी विभक्त रेशनकार्ड करण्यासाठी गेल्या जानेवारी महिन्यापासून प्रत्येक तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत. मुळ रेशनकार्ड कार्डावरील नाव कमी केल्यामुळे त्याचा दाखला व रेशनकार्ड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेकडे प्रलंबित आहेत. तसेच लग्न झालेल्या मुलींचे नाव कमी केलेल्यांचे दाखलेही पडून आहेत. हे दाखले कोणत्याही दुसऱया रेशनकार्डावर समाविष्ट झालेले नसल्याचे बविआचे जिल्हाप्रमुख तानाजी कुळय़े, जिल्हा संपर्कप्रमुख टी. एस. दुडय़े यांनी सांगितले.
ही सर्व प्रकरणे जिल्हय़ातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. अनेक नवीन कार्ड 3 महिन्ये होऊनही मिळालेली नाही. काहींची मिळाली असून ती ऑनलाईन झालेली नाहीत. त्यामुळ ही नवीन रेशनकार्डधारकांची नावे व नाव कमी केलेल्यांची नावे कोणत्याही सर्वेक्षणात आलेली नाहीत. अशी हजारो कार्डधारकांवरील व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. या व्यक्तींना फेब्रुवारी ते मे या महिन्यातील धान्य पुरवठा प्रशासनस्तरावरून केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या बाबत निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर वंचित लाभार्थ्यांची यादी मागवावी
शासन, प्रशासन स्तरावर प्रत्येक तहसीलदार कार्यालयातून अशा सर्व वंचित कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात यावे. किंवा प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमार्फत ज्या व्यक्तींनी नवीन कार्ड करण्यासाठी व नाव कमी करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. अशांची यादी करून ही यादी तत्काळ प्रशासनस्तरावर उपलब्ध करून घ्यावी. त्यानुसार सर्व लाभार्थ्यांना धान्य पुरवठा करावा. कारण संबधित नाव कमी केलेल्या व्यक्ती नवीन रेशनकार्डसाठी घेतलेले दाखले हे येथील मूळ रेशनकार्डवरील रहिवासी आहेत. त्यांनाही सर्वतोपरी सहकार्य करून प्रत्येक महिन्याचे धान्य व मोफत धान्य पुरवठा करावा, अशी मागणी बविआचे तानाजी कुळय़े, टी. एस. दुडय़े यांनी केली आहे.









