युवास्वयंपूर्णझाल्यासगोवास्वयंपूर्णहोईल
प्रतिनिधी/ फोंडा
राज्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकारने स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. युवकांनी सरकारच्या ऑनलाईन सेवा वेबसाईटवर जाऊन या संधींचा शोध घेतला पाहिजे. स्वयंपूर्ण गोवा होण्यासाठी आधी युवा स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. गोव्यात नवीन पहाट उजाडण्यासाठी कुठल्याही दुसऱया राज्यातील लोकांची गरज नाही. येथील तरुणवर्ग त्यासाठी सक्षम आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
फर्मागुडी येथे शनिवारी आयोजित केलेल्या स्वयंपूर्ण युवा रोजगार मेळा व करियर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळय़ात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. राज्यातील 60 कंपन्या या रोजगार मेळय़ात सहभागी झाल्या असून साधारण 1 हजार तरुणांना नोकऱयांची संधी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. व्यासपीठावर मजूर व रोजगार खात्याच्या मंत्री जेनिफर मोन्सेरात, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, जीव्हीएम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकर व मजूर खात्याचे अधिकारी भालचंद्र केंकरे हे उपस्थित होते.
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. सर्वांना सरकारी नोकऱया मिळणे शक्य नाही. मात्र प्रत्येकाला रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकऱयांची संधी उपलब्ध करुन देणे हा या उपक्रमागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फोंडा तालुका तालुका शैक्षणिक हब म्हणून पुढे आला आहे. केजी पासून पीजी पर्यंत शिक्षण देणाऱया नामांकित शिक्षण संस्था फोंडय़ात आहेत. आता राष्ट्रीय न्याय वैद्यकीय विज्ञान संस्थेची त्यात भर पडली आहे. कोरोना काळात राज्यातील विद्यार्थी व पालकांना आधार म्हणून महाविद्यालयीन प्रवेश शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असेही त्यांनी नमूद केले.
मंत्री जेनिफर मोन्सेरात म्हणाल्या, रोजगार मेळा हे राज्यातील सुशिक्षित युवकांच्या करियरला योग्य दिशा देणारे व्यासपीठ आहे. म्हापसा येथील कार्यक्रमातून 270 युवकांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या. गोव्यातील तरुण स्वयंपूर्ण होईल तेव्हाच गोवा खऱया अर्थाने सक्षम होईल.
खासगी क्षेत्रात कल्पकतेला वाव ः गोविंद गावडे
मंत्री गोविंद गावडे यांनी सरकारी कर्मचाऱयांनी ‘कॉपी ऍण्ड पेस्ट’च्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. खासगी क्षेत्रात नवनिर्मिती व कल्पकतेला खूप वाव व संधी असते. तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रातील अशा वाटा शोधल्या पाहिजेत. गोव्यातील युवकांमध्ये बुद्धीमत्ता व कौशल्य आहे. मात्र व्यावसाय क्षेत्रात पुढे येण्याचे धाडस त्यांनी केले पाहिजे. गोव्यात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी येथील युवकांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
युवा शेतकरी वरद सामंत यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतूक
भाजी उत्पादनात नवनवीन प्रयोग करून फलोत्पादन महामंडळाला मोठय़ा प्रमाणात भाजी पुरवठा करणारा दाभाळ – धारबांदोडा येथील युवा शेतकरी वरद सामंत यांचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खास कौतुक केले. खाण पट्टय़ात या 29 वर्षीय तरुणाने विविध प्रकारच्या भाजी उत्पादनावर यशस्वी प्रयोग करून गोव्यातील तरुणांमध्ये स्वयंपूर्णतेचा आदर्श निर्माण केला आहे. भाजी उत्पादनात सामंत यांनी सन् 2019-20 या वर्षात रु. 75 लाखांची उलाढाल केली असून त्यात त्यांचा निव्वळ नफा रु. 35 लाख एवढा आहे. फलोत्पादन महामंडळाला त्यांनी 90 टन कॅबेज तर तीन महिन्यात 8 टन मिर्ची व 15 टन गाजर पुरविले आहेत. गोव्याच्या मातीत गाजराचे उत्पादन होऊ शकणार नाही, हा समज खोटा ठरवित त्याने हे आव्हान पेलून शेतकऱयांना एक सकारात्मक दृष्टीकोन दिलेला आहे.
वरद सामंत यांनी कृषी क्षेत्रातील आपले अनुभव सांगितले. थोडीशी जमीन असल्यास आपण मातीतून सोने पिकवू शकतो, असा संदेश दिला. कृषी क्षेत्रात येऊ पाहणाऱया युवकांना मार्गदर्शनासाठी आपण सदैव उपलब्ध असल्याचे सांगितले.
भालचंद्र केंकरे यांनी स्वागत केले. राज्यातील नामांकित औद्योगिक आस्थापने व सेवा क्षेत्रातील तज्ञांनी युवा मेळय़ाला मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या युवा युवतींना करियरसंबंधी मार्गदर्शन केले.









