ऑनलाईन टीम / मुंबई :
मनीलाँड्रिंग प्रकरणी ईडी कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीने केलेली अटकेची कारवाई बेकायदा असून, तात्काळ सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती मलिक यांचे वकिल तारक सय्यद आणि कुशल मोर यांनी मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे केली आहे.
मलिक हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित सात ठिकाणच्या संपत्तीचे मालक आहेत. डी गँगशी संबंधित संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली आहे. तसेच या प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ईडीने मलिक यांना बुधवारी अटक केली आहे. 3 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव नबाव मलिक जेजे रुग्णालयात दाखल झाले होते. येथे उपचार घेतल्यानंतर सोमवारी त्यांना पुन्हा ईडी कोठडीत नेण्यात आले आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याला मलिकांनी हायकोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. विशेष न्यायाधीशांनी आपल्याला कोठडीत ठेवण्याचा आदेश हा आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर दिल्याचा दावा करत आपली तात्काळ सुटका करा, असे या याचिकेत म्हटले आहे.