सेन्सेक्स-निफ्टीचा विक्रम : वाहन, आयटी कंपन्या तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
नवीन वर्षाचे स्वागत भारतीय शेअर बाजाराने तेजीसोबत केले आहे. आपला तेजीचा प्रवास कायम राखला असून चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी कामगिरी करत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरात प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत प्रामुख्याने वाहन, आयटी आणि दैनंदिन वापरातील साहित्यांची निर्मिती करणाऱया कंपन्यांच्या समभागात लिलाव राहिल्याने बाजारात उत्साह राहिला. सेन्सेक्सने तर सलग पाचव्या दिवशी विक्रमी टप्पा पार केला असून दिवसअखेर सेन्सेक्स 117.65 अंकांनी वाढून निर्देशांक 47,868.98 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 14,018.50 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये आयटी क्षेत्राचे समभाग सर्वाधिक 2.32 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबतच टीसीएस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या नफा कमाईमुळे क्रमशः1.36 टक्क्यांची व 0.83 टक्क्यांची घसरण राहिली आहे.
टीसीएसचे संचालक मंडळ 8 जानेवारी रोजी बैठक आयोजित करणार आहे. त्यामध्ये सादर करण्यात येणाऱया आर्थिक योजनांना मंजुरी देण्यात येईल अशी शक्यता असून या घटनेचा सकारात्मक प्रभाव शुक्रवारी भारतीय बाजारात राहिला होता. विदेशी गुंतवणुकीमध्ये होणाऱया मजबुतीमुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एफपीआयकडून 1,135.59 कोटी रुपयांच्या मुल्याचे समभाग खरेदी झाल्याची माहिती आहे.
मजबुतीचे आठवे सत्र
भारतीय शेअर बाजारात सलगची आठवी तेजी राहिल्याने सेन्सेक्स मजबूतीमध्ये राहिला आहे. यामध्ये 22 डिसेंबरपासून जवळपास पाच टक्क्यांची तेजी दिसली आहे.
वाहन क्षेत्राचा प्रभाव
नवीन वर्षात प्रवेश करत असताना मागील वर्षातील शेवटच्या महिन्यात डिसेंबर महिन्यात वाहन क्षेत्राने मजबूत कामगिरी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकीची विक्री 20 टक्क्यांनी वधारली असल्याने कंपनीचे समभाग 0.53 टक्क्यांनी, बजाज ऑटो 1.03 टक्क्यांनी आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग 1.62 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत.








