चार दिवसाआड पाणीपुरवठा : उच्च दाब नसल्याने नागरिकांची शक्कल : इतर नागरिकांना फटका
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या विविध भागात पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उच्च दाबाने पाणीपुरवठा केला जात नसल्याने मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे काही नागरिकांनी थेट नळालाच विद्युतपंप जोडल्याची तक्रार होत आहे. परिणामी, अन्य नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हिडकल जलाशयाच्या विद्युतपंपांची क्षमता वाढविण्यात आली. मात्र, पाणी समस्या जैसे थे आहे. हिडकल जलाशयामधून दररोज सहा एमजीडी जादा पाणीपुरवठा होऊनदेखील शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही भागात पाच दिवसाआड तर काही उपनगरांमध्ये सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी सांगत आहेत. पण, प्रत्यक्षात काही ठराविक भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राकसकोप आणि हिडकल जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही शहरात पाणी समस्या भेडसावत आहे. पाणी समस्या भेडसावण्यास कारणीभूत कोण, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. काही ठिकाणी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण, उच्च दाबाने पाणीपुरवठा केला जात नाही. विशेषतः शास्त्रीनगर, कोनवाळ गल्ली, मीरापूर गल्ली, शहापूर अशा विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे काही नागरिकांनी थेट नळाला विद्युतपंप जोडले आहेत. नळाला कमी दाबाने पाणी येत असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. तसेच पाणी भरण्यासाठी घराच्या व्यक्तीला अडकून राहावे लागते. त्यामुळे नळाला विद्युतपंप जोडून टाकी भरून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा फटका अन्य नागरिकांना बसत असून नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नळाचे पाणी उच्च दाबाने येत नसल्याने नळाला विद्युतपंप लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा तक्रारी पाणीपुरवठा मंडळाकडे करूनही पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे. नळाला विद्युतपंप लावण्यात येत असल्याची माहिती देऊनही पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.









