वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याची आशा बाळगणारे भारताचे मल्ल नरसिंग यादव व आणखी दोन मल्ल कोरोना चांचणीत पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारताचा अव्वल मल्ल सुशिलकुमार याला 74 किलो वजनगटात आव्हान देणारा दुसरा मल्ल नरसिंग यादवची सोनेपतच्या साई केंद्रामध्ये शनिवारी कोरोना चांचणी घेण्यात आली. त्याचप्रमाणे 77 किलो ग्रीको रोमन गटातील मल्ल गुरूप्रित सिंग आणि फिजिओ विशाल राय हे कोरोना चांचणीत पॉझिटिव्ह ठरले आहेत. या तिघांनाही सोनेपतच्या भगवान महावीर दास रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या शिबिरात दाखल झालेल्या अनेक मल्लांची यापूर्वी कोरोना चांचणी घेतली गेली असून यामध्ये अनेक मल्लांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.









