संकेश्वरातील महिलेच्या खून प्रकरणाचा पाचव्या दिवशी उलगडा : पोलिसांकडून तिघांना अटक : हिंडलगा कारागृहात रवानगी
प्रतिनिधी / संकेश्वर
रविवार दि. 16 रोजी संकेश्वर येथे कमतनूर वेशीतील गौराबाई उर्फ शैलजा निरंजन सुभेदार (वय 55) या सावकारी करणाऱया महिलेचा गोळय़ा झाडून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास मोहीम गतिमान करीत नगरसेवक उमेश कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने खुनाची कबुली दिली.
उमेश याने दिलेल्या कबुलीनुसार, रविवारी सकाळी शैलजा हिच्या घरी जात उमेश याने दरवाजा ठोठावला. शैलजा हिने दार उघडताच उमेश याने घरात प्रवेश करुन दरवाजा बंद करीत शैलजा हिच्या पाठीवर गोळी झाडली. याचवेळी उमेश हा आपला जीव घेणार या भीतीने शैलजा ही वरच्या मजल्यावर पळत असताना उमेश याने तिच्या पाठीवर दुसरी गेळी झाडली. तर तिसरी गोळी चुकवत असतानाच ती गोळी शैलजाच्या हाताला लागली. दरम्यान दोन गोळय़ा शरीरात घुसल्याने शैलजा रक्ताच्या थारोळय़ात पडली. शैलजा मृत्युमुखी पडल्याची खातरजमा करत उमेश याने घरातून पळ काढला. यावेळी विकेंड कर्फ्यू असल्यामुळे सकाळच्यावेळी हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही.
कार, पिस्तूल व मोबाईल जप्त
दरम्यान सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महा†िनंग नंदगावी यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी मंडल पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. यावेळी हाती लागलेल्या पुराव्याच्या आधारे पोलीस संशयितांपर्यंत पोहोचले. यावेळी उमेश याला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. त्यानुसार उमेश, अखिलेश व राहुल या तिघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. या तिघा संशयितांकडून एक कार, खुनासाठी वापरलेली पिस्तूल व मोबाईल पोलिसांनी जप्त
केला आहे.
अवघ्या आठवडाभरात हल्लेखोराला पकडल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. या कारवाईत डीवायएसपी मनोजकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक जे. आय. केळगडे, बी. एस. कपरट्टी, बी. के. नांगनूरी, मुरगेश जंबगी, एम. एम. करगुप्पी सहभागी झाले होते.
गेल्या पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या सावकार महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गुरुवारी संकेश्वर पोलिसांना यश आले. कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून नगरसेवकाने या महिलेचा पिस्तुलाच्या साहाय्याने खून केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार असणारा संशयित व संकेश्वरचा नगरसेवक उमेश कांबळे याच्यासह त्याला पिस्तूल पुरवठा करणारे अखिलेश महेश दरुरमठ (वय 27) व राहुल राजू रजपूत (वय 28, दोघेही रा. सांगली) अशा तिघांना पोलिसांनी गुरुवारी बेडय़ा ठोकल्या. दरम्यान, सावकार महिलेच्या खुनाची बेळगाव जिल्हय़ातील ही पहिलीच घटना आहे.









