प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात सध्या ठिकठिकाणी भटक्या कुत्र्याची टोळकी दहशत माजवत आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून लहान मुले, महिला, वृद्ध लोक अक्षरशः जीव मुठीत घेऊन बाहेर निघत आहेत. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा पालिकेत जिवंत कुत्री आणून सोडू असा इशारा, नगर सेविका तथा अध्यक्ष स्वाभिमानी महिला मंच सौ. आशा पंडित यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांना खेळण्यातले कुत्रे भेट देऊन निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या शहरातील विवीध ठिकाणी कुत्र्यांचा झुंडी चा झुंडी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे रस्त्यावर दुचाकी चालकांचे अपघात होत आहे.लहान मुले, महिला बाहेर वावरताना प्रचंड घाबरलेले आहेत. त्याला कारण ही तसेच आहे. चार वर्षांपूर्वी येथील देवी कॉलनी येथे भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात एका निरागस बालकाला जीव गमवावा लागला होता.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या करिता नगरपालिकेमार्फत जलदगतीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, कोल्हापूर, पुणे येथून डॉग व्हॅन भाडे तत्वावर घेऊन या कुत्र्यांना पकडून जंगलात सोडण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली.









