शेकडो बोट मालकांवर कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ
तुडूंब भरलेल्या शिवसागर जलाशयात पर्यटन सुरु करण्याची मागणी
प्रतिनिधी / कास
तापोळा बामणोली परिसराला निसर्गाचा अनमोल ठेवा लाभला आहे. कोयना नदीच्या (शिवसागर जलाशय) दुतर्फा सह्याद्री पर्वताच्या उंचच उंच डोंगररांगा कडे कपारी, धबधबे, दुर्मिळ वृक्ष लता वेली घनदाट जंगल यांचा खजिना आणि या सर्वात जास्त भर घालते आहे ते शिवसागर जलाशयाने.
शिवसागर जलाशय सध्या तुडूंब भरला आहे. या जलाशयात येणाऱ्या पर्यटकांना नौका विहाराचा आनंद लुटण्याचा हंगाम सध्या आलेला आहे परंतू कोरोना लॉकडाऊनच्या काळात पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे तापोळा, बामणोली परिसरातील असणाऱ्या पाच बोट क्लबच्या शेकडो बोट मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मार्च महिन्यांपासून येथील बोटींग पूर्ण पणे बंद आहे. त्यामुळे बँका व पतसंस्था यांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा मोठा यक्षप्रश्न या बोट मालंकांपुढे उभा आहे. बोटींग बरोबरच नदीकाठी असणारी अॅग्रो टुरिझम, टेंट हाऊस, लॉज, हॉटेल या व्यावसायिकांनाही पर्यटन बंदीचा मोठा फटका बसला आहे. अनेकांनी आपली गुंतवणूक या व्यवसायात केल्याने त्यांना दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे हे सर्व व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. सध्या पर्यटनाचा मुख्य हंगामाचा काळ वाया गेला तर याचा जबर फटका यांना बसणार आहे. याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे शासनाने पर्यटन व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दयावी अशी सर्वांचीच मागणी आहे.

उपलब्ध बोटी व पर्यटनस्थळे तापोळा व बामणोली येथे असणाऱ्या पाच बोट क्लबमध्ये मोटर बोटी, स्पीड बोटी, रोईंग बोटी, वॉटर स्कूटर. होडी अशा प्रकारच्या सुमारे ९०० बोटींचा ताफा उपलब्ध आहे. देशभरासह विदेशातून ही पर्यटक येथे येऊन नौका विहाराचा आनंद लुटतात. मागील वर्षी तर इटली, कॅनडा, जपान येथील पर्यटकांनी नौका विहाराचा आनंद लुटून, वॉव व्हेरी अमेझिंग असे उत्सफूर्त उदगार काढले होते. येथील वासोटा फोर्ट , त्रिवेणी संगम, विनायक नगर, दत्त मंदिर अशी पाहण्यासारखी प्रसिद्ध पॉइंट आहेत.
प्रतिक्रीया
१. ” आमच्या भैरवनाथ बोट क्लब मध्ये १२० लाँचेस उपलब्ध आहेत. मागील वर्षी इटली, कॅनडा, जपान या देशाचे पर्यटक बोटींतून जलविहाराचा आनंद लुटून गेले आहेत. कास पुष्प पठारावर येणारे पर्यटक पुढे बामणोली बोटिंगसाठी येत असतात. त्यानंतर दिवाळी व वासोटा पर्यटन यातून बोटींग व्यवसाय चांगला होत होता. यावर्षी मार्चपासूनच कोरोना मुळे सर्व ठप्प झाले आहे. लाँच मालकांना मात्र दररोज लाँचे पर्यंत फेरी मारावीच लागते. लाँचे वर कागदाचे कव्हर घालणे , लाँचेतून पाणी काढणे , लाँचेच्या दोऱ्या नीट बांधून वादळ वाऱ्यापासून संरक्षण करणे ही कामे चालूच आहेत . त्यांनी कर्ज कसे फेडायचे यासाठी शासनाने लवकरात लवकर पर्यटन व्यवसाय सुरू करावा … “
धनाजी संकपाळ, अध्यक्ष भैरवनाथ बोट क्लब बामणोली
2. मी माझ्या लाँच व हॉटेल व्यवसायासाठी ६२ लाख रूपयांचे बँकांचे कर्ज घेतले आहे. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे सर्व पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. मी माझे कर्ज व व्याज हप्ते कशाने फेडणार शासनाने सर्वांचे पाच महिन्याचे बँक व्याज माफ करावे व पर्यटनास मंजूरी द्यावी. माझ्या सारखे अनेक व्यावसायीक आडचणीत व मानसिक दडपणाखाली आले आहेत. शासनानेही याची वेळीच दखल घ्यावी. राजेंद्र संकपाळ. हॉटेल व्यावसायिक, बामणोली.









