जिल्हा पंचायत माजी सदस्य कारलगेकर यांचे शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांना निवेदन
प्रतिनिधी / खानापूर
नंदगड येथील जेसीएस शाळेला एक इतिहास आहे. नंदगडमधील जनतेने बऱयाच वर्षापासून ही शाळा टिकवून ठेवली आहे. असे असताना शिक्षण खात्याने नंदगड जेसीएस शाळेचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते अत्यंत चुकीचे असून या शाळेचे कुठल्याही परिस्थितीत विलीनीकरण करू नये, अशी मागणी जि. पं. माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर यांनी राज्याचे शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जेसीएस शाळेच्या विलीनीकरणास विरोध असतानाही खानापूरच्या गटशिक्षणाधिकाऱयांनी विलीनीकरण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. याबद्दल शाळा सुधारणा समिती, पालक आणि ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विलीनीकरण करू नये, अशी मागणी शिक्षण आयुक्त आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱयांकडे यापूर्वी केली आहे.
1845 पासून सदर शाळेत मराठी आणि कन्नड मुला-मुलींची वेगळी शाळा आहे. पटसंख्येचे कारण दाखवून केवळ मराठी शाळेचे विलीनीकरण करण्याचा घाट गट शिक्षणाधिकाऱयांनी घातला आहे. दोन्ही शाळांमध्ये पुरेशी पटसंख्या आहे. केवळ मराठीच्या पोटशुळामुळे हे पाऊल शिक्षण खात्याकडून उचलल्याचा आरोप होत आहे. असे झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची तयारीही नंदगड ग्रामस्थांनी केली आहे. स्वातंत्र्योतरनंतर काळापासून सुरू असणाऱया मराठी शाळांची स्थिती चांगली आहे. असे असतानाही केवळ मराठी शिक्षकांची संख्या कमी करण्याच्या भावनेतून हा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तो अन्याय करणारा असून तो निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी मंत्री सुरेशकुमार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाचा स्वीकार करून सुरेशकुमार यांनी विलीनीकरण केले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.









