ऑनलाईन टीम / पुणे :
कोविड काळात आपली आणि आपल्या कुटुंबाची पर्वा न करता कार्य केलेल्यांची दखल समाज घेत असतो. समाजातील सामाजिक संस्था हे कार्य करतात. त्यामुळे सामाजिक संस्था आणि त्यांच्या समाजोपयोगी उपक्रमांची समाजाला आज गरज आहे. तसेच धार्मिक संस्थांकडून धार्मिकतेतून विधायक समाजसेवा होणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र कारागृह विभागाचे निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे कोविड काळात उल्लेखनीय कार्य केलेले डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, परिचारिका आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मुक्ता टिळक, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वस्त डॉ. पराग काळकर, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, युवराज गाडवे, अॅड. प्रताप परदेशी, राजेंद्र बलकवडे, म्हसोबा ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, अक्षय ढमढेरे, मंदिराचे सेवक संजय महागडे आदी उपस्थित होते.
सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, डॉ.अमित गांधी, डॉ.प्राची गांधी, डॉ.भाग्यश्री मुनोत, डॉ. विजय पोटफोडे, सदाशिव कुंदेन, मंडई अधिकारी बाळासाहेब साबळे, रुपेश मते यांसह डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
मुक्ता टिळक म्हणाल्या, दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन ट्रस्ट कार्यरत आहे. अशा प्रकारचे सामाजिक काम समाजामध्ये करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. हेमंत रासने म्हणाले, कोविड सारख्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये या घटकांनी समाजाची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचा सन्मान प्रत्येकाने करायला हवा.