प्रतिनिधी/ फोंडा
धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका शेडमध्ये पत्त्यांचा सध्या पत्त्यांचा जुगार खुलेआमपणे व तेजीत सुरु आहे. या भागातील अनेक युवक या जुगार अड्डय़ावर पैसे उडवित असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. महामार्गाला लागूनच राजरोसपणे हा अड्डा चालत असून पोलीस मात्र त्याकडे डोळेझाक करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या महिन्याभरापासून याठिकाणी हा जुगार अड्डा सुरु आहे. धारबांदोडा व आसपासच्या भागातील अनेक खेळगडय़ांची पत्ते खेळण्यासाठी या जुगार अड्डय़ावर गर्दी असते. सध्या कोरोना महामारीचा वाढता प्रभाव असला तरी पत्ते खेळण्याच्या नादात कुठलेच सामाजिक अंतर पाळले जात नाही. कोरोनासंबंधी अन्य नियमही धुडकावून दिले जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात ई लिलाव केलेल्या खनिजाची वाहतूक सुरु होती. त्यामुळे ट्रक व्यवसायात असलेल्या अनेकांच्या हाती थोडे फार पैसे आले आहेत. त्यापैकी बरेच ट्रकचालक हे पैसे या जुगार अड्डय़ावर उडवित आहेत. शिवाय लॉकडाऊनमुळे ज्या लोकांचे काम धंदे बंद झाले, ते बेकारपणा घालविण्यासाठी या ठिकाणी पत्ते खेळण्याच्या नादात उरले सुरले पैसेही या खेळात उडवित आहेत. यापूर्वी शिरवळ कुळण या शेतीजवळ असलेल्या एका घरात हा जुगार अड्डा चालायचा. त्यासंबंधी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तो बंद झाला. व काही दिवसांनी धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सुरु करण्यात आला. अशा प्रकारे खुलेआमपणे चालणाऱया जुगार अड्डय़ावर पोलीस कारवाई करीत नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबतही लोकांकडून आत्ता संशय व्यक्त होऊ लागला आहे.









