- नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये संततधार असल्याने दोन दिवसांत पुणेकरांना दोन महिने पुरेल, एवढा पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण आज पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून संध्याकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. पुण्यातही धरणक्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. मुळशी धरण पाणलोट क्षेत्रातही काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं ताम्हिणी घाटात 24 तासात 468 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर, खडकवासला धरणातही आज दुपारी तीनपर्यंत 1.75 टीएमसी (88.52 %) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात होणाऱ्या संततधार पावसामुळे आज खडकवासला धरणातून 2 हजार 466 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी चारही धरणांमध्ये 11.55 टीएमसी पाणीसाठा होता. बुधवारी दिवसभर संततधार होती. त्यामुळे पाणीसाठा हा 12.83 टीएमसी झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.