बिबवणेत गणेशोत्सवात ‘कोरोना योद्धय़ां’ना मानाचा मुजरा
वार्ताहर / कुडाळ:
गणेशोत्सवातील देखाव्यांमध्ये त्या-त्यावेळच्या घटनांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. कोरोना महामारीने अवघ्या जगाला विळखा घातला असताना यंदाच्या गणेशोत्सवात त्याची दखल घेण्यात आली नसती, तर नवलच. कुडाळ तालुक्यातील बिबवणे-मांगलेवाडी येथील दशावतारी युवा कलाकार व गणेश मूर्तीकार विघ्नराजेंद्र उर्फ बच्चू कोंडुरकर यांनी आपल्या गणपतीसमोर साकारलेला देखावा लक्षवेधी ठरला आहे. जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढणाऱया ‘कोरोना योद्धय़ां’ना यातून मानाचा मुजरा करण्यात आला आहे. पुराणातील कथेचा आधार घेत कलियुगातील असूर (कोरोना)ला रौद्रावतार धारण करून भस्म करा, असे साकडे त्यांनी गणपतीला घातले आहे.
विघ्नराजेंद्र यांची गणपती शाळा आहे. हा युवा कलाकार गणपतीसमोर दरवर्षी वैशिष्टय़पूर्ण देखावे साकारतो. यावर्षी त्यांचा गणपती सतरा दिवसांचा आहे. सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. प्रशासन यंत्रणा आणि समाजातील बरेच घटक या लढाईत सहभागी झाले आहेत. विघ्नराजेंद्र यांनी यावर्षी देखाव्यासाठी ‘कोरोना’ हाच विषय निवडला आहे.
कोरोनाशी लढणारे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि अदृश्यरुपाने थैमान घालणारा असूररुपी कोरोना असा देखावा साकारला आहे. या कोरोना व्हायरसला त्यांनी पुराणातील असूर म्हणून संबोधले आहे. त्या कथेचा संदर्भ देत तयार केलेली फ्लेक्स देखाव्यासमोर झळकत आहेत. त्यानुसार कृत, त्रेता व द्वापार या तीन युगात धर्म सतेज ठेवण्यासाठी देवाने विविध अवतार धारण केले आणि असुरांचा नाश केला. आज कलियुगात तोच देव डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि या संकटकाळात एकमेकांना सहाय्य करणाऱया मानवाच्या रुपात वावरत आहे. अशा कोरोना योद्धय़ांना त्यांनी यातून मानाचा मुजरा केला आहे.
देखाव्यासाठी गोटय़ा सावंत, सतीश गवंडे व गणेश डिचोलकर यांचे साहय़ लाभले.









