धामोड / वार्ताहर
धामोडपैकी कुरणेवाडी ( ता. राधानगरी ) येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पिडीत मुलीच्या नातलगानेच बलात्कार केल्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेची फिर्याद स्वतः पीडित मुलीने राधानगरी पोलीसात दिली आहे. या प्रकरणी आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण (वय४३ रा .कोगील बुद्रुक तालुका करवीर ) याला राधानगरी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दहा डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
घटनेबाबत राधानगरी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, धामोड पैकी कुरणेवाडी ( ता. राधानगरी ) येथे आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण यांची मुलगी देण्यात आली आहे. या मुलीच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असून त्यांनेच कोगील बुद्रुक या ठिकाणावरून बांधकामासाठी गवंडी आणले आहेत. सदर गवंडयांचे उर्वरीत बांधकाम साहित्य घेऊन आरोपी दरवेशी कुरणेवाडी येथे आला होता. दरम्यान पीडित मुलगीचे वडील मासेमारी व्यवसायनिमित्त बाहेर गेले होते. ते मध्यरात्री परतले यावेळी घरातील सर्व मंडळी झोपलेली होती. त्यामुळे तेही जेवण करून झोपी गेले .
याच मध्यरात्री आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण याने पीडित मुलगी एकटीच स्वतःच्या खोलीमध्ये झोपली असल्याची खात्री करून खोलीत प्रवेश करत तिचे तोंड दाबून धमकी दिली व तिच्यावरती बलात्कार केला. पहाटे घरातील मंडळी उठण्याअगोदरच त्याने घरातून पोबारा केला. सकाळी मुलीने रात्री घडलेला प्रकार आपल्या आईच्या कानावर घातला. पिडीत मुलगीचे आई वडील व भाऊ यांनी मुलीसह राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत संबंधित आरोपीवर गुन्हा नोंद केला .
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राधानगरी पोलिसांनी तात्काळ या आरोपीला कोगील बुद्रुक येथून अटक केली आहे. व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राधानगरी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १० डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डुबल व पोलीस उपनिरीक्षक एम .एच. शेख हे करत आहेत .