तलावात मगरींचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट
प्रतिनिधी / मालवण:
धामापूर तलावाच्या काठावर मंगळवारी सायंकाळी मगरीचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली. वन विभागाने पंचनामा करून आज मगरीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मगरीचे पिल्लू सापडल्याने धामापूर तलावात मोठी मगर असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
धामापूरचे उपसरपंच लक्ष्मण वालावलकर यांचा मुलगा अथर्व याला तलावाच्या काठावर मगरीचे पिल्लू मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. हा मृतदेह खराब झाला होता. ग्रामस्थांनी याची माहिती तात्काळ वन विभागाला दिली. वन विभागाचे आरएफओ आणि त्यांची टीम धामापूर तलावावर दाखल झाली. गावातील अन्य ग्रामस्थ घटनास्थळावर पोहोचले आणि वन विभागाच्या अधिकाऱयांना पंचनामा करण्यासाठी सहकार्य केले.
मृत्यूचे कारण समजू शकले नाही
मगरीच्या पिल्लाचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नव्हते. बुधवारी विच्छेदन करण्यात येणार होते. मात्र, मृतदेह पूर्णपणे खराब झाल्याने पंचनामा करतच त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. डीएफओ चव्हाण आणि आरएफओ शिंदे यांनाही याची माहिती देण्यात आली. त्वरित आरएफओ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या टीमने घटनास्थळी भेट दिली. पर्यावरणप्रेमी सचिन देसाई, मोहम्मद शेख, ऍड. ओमकार केणी, मोगरणे वाडीतले ग्रामस्थ, धामापूर वन रक्षक सादिक फकीर आदी अधिकारी उपस्थित होते.
तलाव परिसरात मद्यपानाचा अड्डा
तलाव परिसरात म्हणजे कासार टाका समोरील जागेत वन विभागाचे अधिकारी आले, तरी काही युवक मद्यपान करत होते. मृत मगरीचा पंचनामा करताना वाटेत, काही दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या. धामापूर गावाची सक्षम वन समिती बनणे गरजेचे आहे. वन विभागानेही वन क्षेत्रात पेट्रोलिंग केले पाहिजे. मद्यपान, शिकार हे या परिसरात वाढत आहे, याकडे वन विभागाने गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.
मगरींचे प्रजनन स्थान?
काही वन्य जीव अभ्यासकांच्या प्राथमिक निरीक्षणानुसार मृत मगर सापडलेल्या जागेच्या जवळपास मगरीचे प्रजनन स्थान असण्याची शक्मयता नाकारता येत नाही. ‘क्रोकोडाईल’ (मगर) ही ‘असुरक्षित’ प्रजाती म्हणून वर्गीकृत असून कायद्याद्वारे संरक्षित प्रजाती आहे. त्यामुळे धामापूर तलावातील मगरींचे अस्तित्व स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाची जबाबदारी वाढलेली आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
एक वर्ष वयाची मगर वन विभागातर्फे धामापूर तलावाच्या काठी सापडलेली मगर एक वर्षाची होती. तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. विच्छेदन करण्यायोग्य मृतदेह राहिला नव्हता. त्याची पंचनामा करून विल्हेवाट लावण्यात आली, असे सांगितले.









