खर्च केलेला निधीही गेला वाया
धामणे : धामणे-बस्तवाड हा शिवारातून जाणारा रस्ता सोयीचा आहे. यासाठी मंजूर झालेला 3 कोटी 35 लाखाचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, एका शेतकऱयामुळे हा रस्ता अर्धवटच राहिला. त्यामुळे निधी खर्चूनही काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा धामणे-बस्तवाड ग्रा. पं. व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.
पाच वर्षांपूर्वी 2 कि.मी. रस्ता करण्यात आला. मात्र, धामणे गावापासून एक कि.मी. रस्ता अर्धवट ठेवण्यात आला. एका शेतकऱयाने या रस्त्यास विरोध केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आडमुठेपणामुळे इतर शेतकऱयांचे काहीच चालले नाही. त्यामुळे हा रस्ता अर्धवटच राहिला आहे.
राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी धामणे तसेच इतर गावांना हा रस्ता जवळचा आहे. शेतकऱयांनाही हा रस्ता फायद्याचा होणार आहे. आता निधी खर्च करण्यात आला तरी रस्ता अर्धवट राहिल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
धामणे नवी गल्ली येथून एक कि.मी. आणि बस्तवाड येथील नवीन जैन बस्तीपासून रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. या रस्त्यासाठी अनेक शेतकऱयांनी जमिनी दिल्या. मात्र, एका शेतकऱयाने अडथळा आणल्याने समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन हा रस्ता करावा, अशी मागणी करण्यात आली.









