कृष्ण व बलराम कौरवांच्या सभागृहामध्ये आले. तेथे धृतराष्ट्र, दुर्योधन, दु:शासन, कर्ण, शकुनी हे शोकाचे नाटक करत बसले होते. त्यांच्या मनाला मात्र पांडव लाक्षागृहात जळून मेल्याबद्दल अत्यानंद होत होता. कृष्णाने त्यांच्या मनातील भावना जाणून त्यांचे मुळीच सांत्वन केले नाही. मग श्राद्धाच्या भोजनाच्या पंक्ती बसल्या. कृष्ण व बलराम हस्तिनापुरात गेले असता इकडे द्वारकेत काय राजकारण शिजत होते पहा.
रामगोविन्द गजसाह्वया । गेले कौरवां सान्तवावया। तो संधि पाहूनि शतधन्वया । एकान्तनिलया नेऊनी। कृतवर्मा आणि अक्रूर । साभिमानी स्वपक्षपर । होऊनि कथिती गूढ मंत्र । दैवानुसार भवितव्य । म्हणती कां पां अद्यापिवरी । वीरश्री नुपजे तव अंतरिं। स्यमंतक सत्राजिताचे घरिं । नाद्यापिवरी अपहरिसी। प्रसंगी रामकृष्ण नसतां । सिंतरूनियां सत्राजिता । स्यमंतकहरणाचा तत्त्वता । संधि साधितां हा समय। सत्राजित हा परमान्यायी । कां पां न सले तुझ्या हृदयीं। ऐसिया घालितां महदपायीं। अल्पही नाहीं भय पाप । सत्राजितें परमान्याय । जरी तूं म्हणसी केला काय । तो तुज कथितों ऐकता होय। क्षोभे हृदय तद्दु:खें ।
कृष्ण व बलराम हस्तिनापुरास गेले आहेत ही अनासायास आलेली संधी आहे हे कृतवर्मा व अक्रूर यांनी जाणले. त्यांनी शतधन्वाला गाठले. त्याला एकान्तवासात नेऊन ते त्याला म्हणाले – शतधन्वा! अजुनी तुझ्या अंगात वीरश्रीचा संचार कसा होत नाही? स्यमंतकमणी अजुनी सत्राजिताच्या घरी आहे. त्याचे अपहरण तू अजून का केले नाहीस? बलराम व कृष्ण दूरदेशी गेले आहेत. सत्राजिताला पराभूत करून स्यमंतकमणी मिळवायची हीच संधी, हीच वेळ आहे. सत्राजित हा परम अन्यायी आहे. त्याला पराभूत करण्यात व स्यमंतकमणी काढून घेण्यात कोणतेच पाप नाही. सत्राजित परम अन्यायी कसा हे तू विचारशील तर त्याचे कारण सांगतो ऐक. त्याने केलेल्या अन्यायामुळेच आमच्या हृदयात क्षोभ व दु:ख निर्माण झाले आहे.
सत्यभामा स्वकन्यारत्न । गुणलावण्यचातुर्यभुवन। आम्हांकारणें कृतवाग्दान। जो कृष्णार्पण पुन्हा करी ।
आमुचा केला जैं अव्हेर। जालों तेव्हांचि निंद्यतर । धिक्कारिती लहान थोर ।सर्वीं सर्वत्र निंद्यत्वें । कांहीं दोष याचिये ठायीं। देखोनि कन्या दिधली नाहीं । ऐसें बोलती जन सर्वही। परमान्यायी हा ऐसा । म्हणसी सत्राजित जीत असतां। स्यमंतक केंवि चढेल हाता । तरी जेथ त्याचा प्रसेन भ्राता । हा तत्पथा लावावा । मणि न करूनि नृपार्पण । प्रसेनें केला कंठाभरण । मृगेन्दहस्तें पावला मरण । तैसेंचि जाण या कीजे ।
सत्राजिताची कन्या सत्यभामा ही अत्यंत लावण्यवती होती. अनेकांचा तिच्यावर डोळा होता. शतधन्वा, अक्रूर, कृतवर्मा या पराक्रमी वीर यादवांनी तिला लग्नाची मागणीही घातली होती. प्रत्येकाला वाटत होते की सत्यभामा आपलीच पत्नी व्हावी. पण सत्राजिताने आपल्या या कन्येचा विवाह कृष्णाशी लावून दिला. त्यामुळे या सर्वांना मनातून राग आला व दु:खही झाले.
Ad. देवदत्त परुळेकर








