मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या भेटीसाठी आपण दिल्लीला जात आहोत. त्यामुळे येत्या दोन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्हादई आणि सीमाप्रश्नाच्या संदर्भात कर्नाटक सरकारकडून नवे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच सुवर्णविधानसौध येथे दोन महिन्यांतून एकदा मंत्रिमंडळाची बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव दौऱयावर आले असता येडियुराप्पा यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती जाहीर केली.
महाराष्ट्राकडून कर्नाटक राज्यातील काही जिल्हय़ांना पाणी पुरवठा करवून घेण्याबाबतही अधिकाऱयांशी चर्चा करून पावले उचलण्यात येतील. दिल्ली येथे दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन पाणीप्रश्न सोडविण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सुवर्णविधानसौध येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक दोन महिन्यांतून एकदा घेण्याबाबत मंत्रिमंडळ विचार करत आहे. यावर लवकरच अधिकृत निर्णयाची घोषणा करण्यात येईल, असेही येडियुराप्पा यांनी सांगितले.









