फलटण – प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती भागातील देशी दारुचे दुकान फोडून दोन लाख 57 हजार 424 रुपयांच्या दारुच्या बाटल्या चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी चार संशयीतांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत विजय सरगर वय 31 राहणार खाटीक गल्ली कसबा पेठ फलटण यांचे क्रांतीसिंह नाना पाटील चौक परिसरातील पंढरपूर पुलानजिक देशी दारुचे दुकान आहे. दिनांक 21 मार्च 2020 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते दिनांक 15 एप्रिल 2020 रोजीचे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाचा पाठीमागील पत्रा उचकटून आतील गोडवूनच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून दोन लाख 57 हजार 424 रुपयांचा सखु संत्रा टँगो च्या सीलबंद बाटल्यांचा माल चोरून नेण्यात आला होता. सदर दुकान हे पत्रयाच्या शेड वजा दुकानात आहे. कॅनॉल जवळ असल्याने अंधाराचा फायदा घेवून चोरी केली आहे. या गुह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ यांना मिळालेल्या माहितीवरुन सदर गुन्हयामध्ये संग्राम भालचंद्र जाधव वय 25 राहणार सोमवार पेठ फलटण, रवींद्र काळू धोत्रे वय 28 राहणार मच्छी मार्केट जवळ रविवार पेठ फलटण, प्रवीण विलास निकाळजे वय 25 राहणार सोमवार पेठ फलटण, किरण शंकर चव्हाण वय 28 राहणार सोमवार पेठ फलटण या संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.









