जायडस कॅडिला चालू आठवडय़ात मागणार मंजुरी
वृत्तसंस्था / अहमदाबाद
भारतातील दिग्गज औषध कंपन्यांमध्ये सामील जायडस कॅडिला पुढील आठवडय़ात स्वतःची कोरोनावरील लस जायकोव्ह-डीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी केंद्रीय औषध नियामकाकडे अर्ज करणार असल्याचे समजते. या लसीला मंजुरी मिळाल्यास ही कोरोना विषाणूच्या विरोधातील जगातील पहिली डीएनए लस ठरणार आहे. याचबरोबर देशात उपलब्ध लसींची संख्या 4 वर जाणार आहे. भारतात आतापर्यंत कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक-व्हीला मंजुरी मिळाली आहे.
लसीच्या तिसऱया टप्प्यातील परीक्षणाचे डाटा ऍनालिसिस जवळपास तयार आहे. चालू आठवडय़ात आपत्कालीन वापराच्या परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती कंपनीने सरकारला दिली आहे. या लसीचे परीक्षण प्रौढांसह 12-18 वयोगटातील मुलांवरही केले जात आहे. अहमदाबादची या कंपनीने चालू आठवडय़ात मंजुरीसाठी अर्ज केल्यास ही लस मुलांनाही दिली जाऊ शकते का हे पाहण्यासाठी पुरेसा डाटा उपलब्ध होणार आहे.
कोल्ड चेनची गरज नाही
डीएनए-प्लाज्मिड आधारित जायकोव्ह-डी ही तीन डोसची लस असणार आहे. ही लस 2-4 अंश सेल्सिअस तापमानावर संग्रहित केली जाऊ शकते. याकरता कोल्ड चेनची गरज भासणार नाही. यामुळे देशाच्या दुर्गम भागांमध्ये याची वाहतूक करणे सोपे ठरणार आहे. ही लस विकसि करण्यास नॅशनल बायोफार्म मिशनकडून मदत मिळाली आहे.
लसीचे कार्यस्वरुप
प्लाज्मिड डीएनए मानवी शरीरावर शिरल्यावर व्हायरल प्रोटीन होते. शरीरात विषाणूच्या खऱया आक्रमणासारखाच हा अनुभव करविला जातो. यामुळे शरीरात विषाणूच्या विरोधात मजबूत इम्युन रिस्पॉन्सन विकसित होतो. यातून विषाणूची वाढ रोखली जाते. जर एखादा विषाणू स्वतःचा आकार-प्रकार बदलत असल्यास किंवा त्यात म्युटेशन झाल्यास ही लस काही आठवडय़ांमध्येच बदलली जाऊ शकते.









