कोरोनाबाधितांचा आकडा 14 लाखांच्या उंबरठय़ावर : मृतांमध्येही होतेय वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भारतीयांची चिंता वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असले तरी अद्याप त्याला यश आलेले नाही. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 14 लाखांच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. मागील दोन दिवसात देशात जवळपास एक लाख रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसात देशात दररोज जवळपास 50 हजार जणांना संसर्ग होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यापासून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसाला लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ‘आरोग्य सेतू’ ऍपवरील आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात कोरोनाचे 48 हजार 916 रुग्ण आढळले असून, देशभरातील रुग्णसंख्या 13 लाख 36 हजार 861 वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात आणखी 757 बळी गेले असून एकूण मृतांचा आकडा 31 हजार 358 झाला आहे. देशात मागील तीन दिवसांपासून 750 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक, आसाम आणि बिहार या राज्यांत रुग्णवाढ अधिक आहे.
8,49,432 जणांची कोरोनावर मात
देशात दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाणही इतर देशांच्या तुलनेत समाधानकारक आहे. भारतात कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण 64 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत देशात 13 लाख जणांना संसर्ग झाला असला तरी त्यापैकी 8 लाख 49 हजार 432 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यांची स्थिती
महाराष्ट्रात एका दिवसात 9,615 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 3,57,117 वर पोहोचली आहे. तामिळनाडू हे देशातील दुसऱया क्रमांकाचे प्रभावित राज्य आहे. तेथे आतापर्यंत 3,320 लोक मरण पावले असून 1,99,749 लोकांना संसर्ग झाला आहे. दिल्लीमध्ये 1,055 नवीन प्रकरणांसह एकूण रुग्णसंख्या 1 लाख 30 हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 53,545 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.









