नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मागील काही दिवसांपासून चढ-उतार दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच 30 हजारांच्या खाली असलेला दैनंदिन नव्या बाधितांचा आकडा पुन्हा 35 हजारांच्या वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रुग्णसंख्येत दिवसभरात 35 हजार 662 एवढी भर पडली आहे, तर 281 बाधितांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान 33 हजार 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी नव्या रुग्णसंख्येपैकी एकटय़ा केरळमध्ये 23 हजार 260 नवीन रुग्ण सापडले आहेत. तसेच केरळमध्ये दिवसभरात 131 जणांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरणाचा वेग कायम
देशात शुक्रवारी एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक विक्रमी डोस देण्यात आले. त्यानंतर शनिवारीही दिवसभरात जवळपास 85 लाख लाभार्थींना लसीचे डोस देण्यात आले. शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत देशात दिवसभरात 83 लाख 54 हजार 913 इतक्या लस लाभार्थींची नोंद झाली होती. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चारवेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.









