नवी दिल्ली
कोरोना विषाणूमुळे भारतात आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील सुरतमध्ये एका 69 वर्षांच्या माणसाचे निधन झाले आहे. कोरोनामुळे भारतामध्ये झालेला हा सातवा मृत्यू आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. यापूर्वी रविवारी मुंबईमध्ये एका खासगी रुग्णालयात 63 वर्षांच्या व्यक्तीने प्राण सोडले. या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. बिहारमध्येही कोरोनामुळे रविवारी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. 38 वर्षांच्या एका व्यक्तीचे पटनामधील एम्स इस्पितळामध्ये निधन झाले आहे. ही व्यक्ती बिहारच्या मुंगेरमध्ये राहणारी होती. काही दिवसांपूर्वीच सदर रुग्ण कतारवरून परतला होता. बडोद्याच्या रुग्णालयातही एका 65 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, पण या महिलेचे कोरोनाचे वैद्यकीय अहवाल अजून आलेले नाहीत.
लॉकडाऊन म्हणजे काय?
लॉकडाऊन ही आपत्कालीन यंत्रणा असते. एखाद्या ठिकाणी लॉकडाऊन असल्यास त्या भागातील लोकांना घरे सोडण्याची परवानगी नाही. केवळ आवश्यक गोष्टींसाठी निर्गमन परवानगी आहे. जर एखाद्यास औषध किंवा अन्नधान्याची गरज असेल तरच तो बाहेर जाऊ शकतो किंवा त्याला रुग्णालय आणि बँकेच्या कामासाठी परवानगी मिळू शकते. नियम मोडण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशासनाकडून कारवाई अटळ असते.
75 जिल्ह्य़ांमध्ये पूर्ण टाळेबंदी
केंद्र सरकारने देशातील 75 जिल्हय़ांमध्ये 31 मार्चपर्यंत पूर्ण टाळेबंदी घोषित करण्याची सूचना संबंधित राज्यांना केली आहे. त्या जिल्हय़ांची सूची खालीलप्रमाणे आहे. मात्र, राजस्थान, तेलंगणा, महाराष्ट्र, हरियाणा आदी राज्यांनी याहीपुढे जाऊन संपूर्ण राज्यातच टाळेबंदी करण्याची तयारी चालविली आहे. महाराष्ट्रात सर्व शहरांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. राजस्थानात बाहेरून येणाऱया सर्व बसेसवर बंदी घालण्यात आली आहे. हरियाणात एकंदर सात जिल्हय़ांमध्ये संचारबंदी सदृश स्थिती ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश : प्रकाशम, विजयवाडा, विशाखापट्टण
चंदीगड : चंदीगड
छत्तीसगड : रायपूर
दिल्ली : मध्य पूर्व, उत्तर, पश्चिम, ईशान्य, दक्षिण, पश्चिम, मध्य
गुजरात : कच्छ, राजकोट, गांधीनगर, सुरत, वडोदरा, अहमदाबाद
हरियाणा : फरीदाबाद, सोनीपत, पंचकुला, पानीपत, गुरूग्राम
हिमाचल प्रदेश : कांगडा
जम्मू-काश्मीर : श्रीनगर, जम्मू
कर्नाटक : चिकबळ्ळापूर, म्हैसूर, कोडगू, कलबुर्गी, बेंगळूर
केरळ : एर्नाकुलम, इडुकी, कान्नूर, कासरगोड, कोट्टायम, मल्लापुरम, पथनमथिट्टा, थिरूवनंतरपुरम, थ्रिसूर
लडाख : कारगिल, लेह
मध्यप्रदेश : जबलपूर
महाराष्ट्र : अहमदनगर, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, मुंबई उपनगर, पुणे, रत्नागिरी, रायगड, ठाणे यवतमाळ
ओडीशा : खुरदा
पाँडीचेरी : माहे
पंजाब : होशियारपूर, एसएएस नगर, एसबीएस नगर
राजस्थान : भिलवाडा, झुनझुनू, सिकर, जयपूर
तामिळनाडू : चेन्नई, कांचीपुरम
तेलंगणा : भद्राद्री, कोठागुडम, हैद्राबाद, मेडचाई, रंगारेड्डी, संगारेड्डी
उत्तर प्रदेश : आग्रा, जीबी नगर, वाराणसी, लखीमपूर खेरी, लखनौ
उत्तराखंड : डेहराडून
पश्चिम बंगाल : उत्तर 24 परगाणा
चंदीगड 31 मार्चपर्यंत बंद
चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने संपूर्ण प्रदेश 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. रूग्णालये आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
दिल्ल्लीत सोमवारपासूनच टाळेबंदी
दिल्ली सरकारने संपूर्ण प्रदेशात सोमवारी पहाटे 6 वाजल्यापासून टाळेबंदी घोषित केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या जाणार आहेत.
नागालँडमध्ये अनिश्चित काळासाठी बंदी
कोरोनाचे संकट लक्षात घेता नागालँडमध्ये अनिश्चित काळासाठी टाळेबंदी घोषित करण्यात आली. असा उपाय योजणारे ते पहिले राज्य ठरले.
उत्तर प्रदेशात 15 जिल्हे बंद
राज्यातील रोजंदारीवरच्या कोटय़वधी कामगारांना महिना 1000 रूपयांच्या आर्थिक साहाय्याची घोषणा केल्यानंतर आता उत्तर प्रदेश राज्याने 15 जिल्हय़ांमध्ये टाळेबंदी घोषित केली आहे. मुंबई व गुजरातमधून उत्तर प्रदेशमध्पे परतणाऱया नागरीकांमुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक उपाय योजनाही घोषित केल्या. ज्या जिल्हय़ांमध्ये असे नागरीक अधिक प्रमाणात येणार आहेत, त्या जिल्हय़ांमध्ये संचारबंदीसदृष स्थिती घोषित करण्यात आली, परतलेल्या नागरीकांची चाचणी केली जाणार असून बाधितांना विलग केले जाणार आहे.
तामिळनाडूत स्वयंसंचारबंदी सोमवारपर्यंत
तामिळनाडू सरकारने स्वयंसंचारबंदीचा कालावधी सोमवारपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही स्वयंसंचारबंदी असेल.
गुजरातमध्ये अतिदक्षतेच्या सूचना
गुजरात राज्याच्या सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर दक्षता घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनांना केल्या आहेत. खासगी रूग्णालयांनाही सज्ज ठेवण्याचा आदेश देण्यात आल्या असून काही बेड्स् अलगीकरणासाठी स्वतंत्र ठेवण्याची सूचना मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केली आहे.